कारवाई करण्यास भारतीय लष्करास माझा पूर्ण पाठिंबा – अँटोनी

नवी दिल्ली- पाक सैन्यांकडून गेल्या काही दिवसांपासून सीमेवर सतत गोळीबार व घुसखोरी करण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे आता सीमारेषेवरील परिस्थितीचे गांभीर्य संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांच्या लक्षात आलेले दिसत आहे. त्यामुळेच योग्य वाटेल‘ ती कारवाई करण्यास भारतीय लष्करास आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी आज स्पष्ट केले.

पाकिस्तानबरोबरील सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर संरक्षणमंत्र्यांचे हे विधान भारतीय लष्करास योग्य तो संदेश देणारे असल्याचे मानले जात आहे.
आयएनएस विक्रांत संपूर्ण भारतीय बनावटीच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचे अनावरण केल्यानंतर अँटोनी यांनी याविषयीची भूमिका मांडली. गेल्या दोन दिवसांत पाकिस्तानी सैन्याने तब्बल पाच वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारतीय लष्करानेही पाक सैन्याच्या या आगळिकीला जोरदार प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला आहे.

अँटोनी यांनीही आता भारतीय लष्करास आपला ठाम पाठिंबा दर्शविला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात पाक सैन्यप्रमुख जनरल अश्फाक कयानी हे सेवानिवृत्त होत आहेत. पाक सैन्यामधील बदलत्या वातावरणाच्या पार्श्‍वभूमिवर येत्या काही महिन्यांमध्ये सीमारेषेवरील वातावरण तप्तच राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणी देशातील कानाकोपर्‍याधून व्यक्त होत आहे.