वॉशिंग्टन – चॉकलेट हे असे खाद्य आहे की ज्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आकर्षण असते. चॉकलेटमुळे दात किडतात, अन्य आजार होतात, ते खाऊ नये अशी नानाविध कारणे शोधून चॉकलेट खाण्यापासून आपण अनेकांना रोखतो. मात्र चॉकलेटयुक्त पेयांचे अतिशय चांगले फायदे असल्याचे अमेरिकन संशोधकांच्या आता लक्षात आले आहे.
हॉट चॉकलेट खा, मेंदू तल्लख ठेवा
कोको पावडर असलेल्या गरम पेयामुळे(हॉट चॉकलेट) मानवाचा मेंदू निरोगी राहत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. दररोज दोन कप हॉट चॉकलेट प्यायल्याने मेंदू अधिक कार्यक्षम होऊन प्रगल्भ होत असल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन अमेरिकन अॅकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीच्या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध केले आहे. अमेरिकेच्या संशोधकांनी नुकतेच सरासरी 73 वयोमर्यादा असलेल्या 60 व्यक्तींवर एक संशोधन केले. यामध्ये या लोकांना सलग तीस दिवस हॉट चॉकलेट हे पेय देण्यात आले. पण या पेयाव्यतिरिक्त त्यांना त्या दिवसात इतर कोणतेही चॉकलेट देण्यात आले नाही.
त्यानंतर त्यांच्या बुद्धिमत्तेची व विचार करण्याच्या कौशल्यासंदर्भात चाचणी घेण्यात आली. त्या वेळी त्यांच्या मेंदूला मोठया प्रमाणात रक्तपुरवठा होऊन त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेमध्ये प्रगल्भता आल्याचे दिसून आल्याचे अमेरिकन अॅकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीचे सदस्य व बोस्टनमधील हॉवर्ड मेडिकल स्कूलमध्ये संशोधन करणा-या फर्झानेह सोरोंड यांनी सांगितले.
मेंदूचे कार्य सुरळीत होण्यासाठी त्याच्या विविध भागाला ऊर्जा मिळणे आवश्यक असते. त्यामुळे मेंदूला होत असलेल्या रक्तपुरवठयामुळे ही ऊर्जा मिळत असल्याचे संशोधनातून समोर आले. त्यामुळे अल्झायमरसारख्या आजारांवर मात करण्यास मदत होऊ शकते असे सोरोंड यांनी सांगितले. संशोधनाच्या सुरुवातीला या 60 जणांपैकी 18 जणांच्या मेंदूला रक्ताचा पुरवठा कमी प्रमाणात होत होता. पण या संशोधनानंतर त्यांच्या मेंदूला होणा-या रक्ताच्या पुरवठयामध्ये 8.3 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले.
तसेच मेंदूला सुरळीत रक्त पुरवठा होणा-या व्यक्तींच्या मेंदूलाही चांगल्या प्रकारे रक्तपुरवठा होऊन त्यांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ झाल्याचे दिसून असल्याचे सांगण्यात आले आहे.