…येथे होते महिलांच्या केसांची चोरी!

माराकॅबो – चोरी ही आतापर्यंत सोने, चांदीचे दागिने, पैसे तसेच इतर मौल्यवान वस्तूंची होत असे. मात्र व्हेनेझुएला येथे महिलांना मात्र वेगळ्याच गोष्टीपासून सावधान राहावे लागत आहे. व्हेनेझुएलामध्ये महिलांचे केस चोरीला जाण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

सध्या या भागात एक चोरांची टोळी सक्रिय झाली आहे, जी भर रस्त्यात महिलांचे केस कापून ते पळवून नेत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. महिलाघराबाहेर पडताना आपले पाकिट, पर्स, मोबाईल चोरीला जाऊ नये, म्हणून खबरदारी घेतात. मात्र इथेतर वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात व्हेनेझुएलामधील एका महिलेने सांगितले आहे की, आधी एका चोरांच्या टोळीने तिला बंदुक दाखवून घाबरवलं, तेव्हा आधी तिचा मोबाईल, पर्स चोरून नेतील असं तिला वाटलं. मात्र या चोरांनी चक्क तिसे केस कापून ते पळवून नेले.

व्हेनेझुएलामध्ये चांगल्या क्वालिटीचे केस 200 पाऊंड किमतीला विकले जातात. या केसांचा वापर विग बनवण्यासाठी केला जातो. जेव्हापासून केसांच्या चोरीचा प्रकार वाढला आहे, तेव्हापासून विग वापरणार्‍यांची संख्याही वाढली आहे. हे चोर महिलांना भर रस्त्यात बंदुक दाखवतात आणि त्यांना केसांची पोनीटेल बांधायला लावतात. त्यानंतर वस्तर्‍याने पोनीटेल कापून टाकतात आणि पळून जातात.

व्हेनेझुएला येथील माराकॅबो या शहरात केसचोरीच्या घटना वाढल्या आहे. शॉपिंग मॉलमध्येही या चोरांच्या भीतीने सुरक्षारक्षकांची संख्या वाढवण्यात आली आहे.