केरळात मुख्यमंत्री हटाव मोहीम तीव्र

तिरुवनंतपुरम् – केरळाचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांना पदावरून हटवावे या मागणीसाठी विरोधी डाव्या आघाडीने सुरू केलेले आंदोलन तीव्र झाले असून आंदोलकांनी तिरुवनंतपुरम्मध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने करायला सुरुवात केली आहे. काल राज्याच्या विविध भागातून डाव्या आघाडीचे हजारो कार्यकर्ते राजधानीत येऊन दाखल झाले. दरम्यान, सरकारने सुद्धा कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी राजधानीत चोख पोलीस बंदोबस्त केलेला आहे.

केरळमध्ये सध्या गाजत असलेल्या सोलार स्कॅम या भ्रष्टाचार प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना हटवावे, अशी विरोधकांची मागणी आहे. या प्रकरणातील आरोपी सरिता एस. नायर हिच्यावर आरोप केले जात आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी तिच्याशी आपला काही संबंध नाही, असा खुलासा करून हात झटकले आहेत. परंतु काल विरोधी पक्षांची निदर्शने सुरू होण्याच्या दिवशीच माकपाच्या ताब्यातील पीपल टीव्ही या वृत्तवाहिनीने सरिता नायर आणि मुख्यमंत्री एका व्यासपीठावर असल्याचे दृश्य प्रक्षेपित केले.

या छायाचित्रात सरिता नायर मुख्यमंत्र्यांच्या कानाशी लागून काही तरी बोलत असल्याचे दिसत आहे. त्यावरून सरिता नायर आणि मुख्यमंत्री यांचे निकटचे संबंध आहेत असा डाव्या आघाडीचा दावा आहे. हे दृश्य नेमक्या याच दिवशी प्रसिद्ध झाल्यामुळे मुख्यमंत्री अडचणीत आले आहेत. दरम्यान, सत्ताधारी लोकशाहीवादी आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस मनी ग्रुप या पक्षानेही मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.