किश्तवाड दंगल प्रकरणी जम्मूत चार जिल्ह्यांत संचारबंदी

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील हिंसाचारग्रस्त किश्तवाड जिल्ह्याला भेट देण्यासाठी गेलेले अरुण जेटली यांच्यासह अनेक नेत्यांना विमानतळावर स्थानबद्ध करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर काही राजकीय पक्ष परिस्थिती बिघडविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. कोणत्याही पक्षाचे नाव घेणे मात्र त्यांनी टाळले.

काश्मीर खोर्‍यात 2008 प्रमाणे (अमरनाथ जमीन वाद) अस्थिर परिस्थितीची पुनरावृत्ती करण्याचा काही लोक प्रयत्न करत असल्याचेही जेटली म्हणाले. खबरदारीचा उपाय म्हणून आणखी तीन जिल्ह्यांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तिन्ही जिल्ह्यांतही लष्करी तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. जम्मू क्षेत्रातील दहापैकी सात जिल्ह्यांत सध्या तणावाची स्थिती आहे. गेले तीन दिवस संचारबंदी असलेल्या किश्तवाडमध्ये आणखी एक मृतदेह सापडल्याने बळींची संख्या तीनवर पोचली आहे. शंभरपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

जम्मू, राजौरी आणि दोडा जिल्ह्यात लष्कराच्या जवानांनी केलेल्या ध्वजसंचलनानंतरही काही ठिकाणी संघर्ष झाल्याच्या घटना घडल्या आहेत. किरकोळ घटना वगळता परिस्थिती सामान्य असल्याचा दावा लष्करी प्रवक्त्याने केला आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आज खुला करण्यात आला. लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्यानंतरच तो खुला झाला.

Leave a Comment