नवी दिल्ली – दिवाळ्यात निघालेल्या किंगफिशर एअरलाईन्स् या प्रवासी वाहतूक कंपनीच्या कर्जाची वसुली करण्यासाठी देणेकर्यांनी या कंपनीच्या मुंबईतल्या मुख्यालयावर ताबा मिळवला आहे. एसबीआय कॅप या ट्रस्टची कंपनीने काल मुंबईतले हे मुख्यालय ताब्यात घेतले. किंगफिशर कंपनीला २०१२ च्या ऑक्टोबरपासून घरघर लागली होती आणि तिचे देणे थकले होते. किंगफिशर कंपनीला दिलेल्या कर्जाचे व्याज धरून कंपनीकडून विविध वित्तीय कंपन्यांना ७,५०० कोटी रुपये देणे होते.
किंगफिशरच्या मुख्यालयावर देणेकर्यांचा ताबा
या देण्यातील मुख्य कर्ज स्टेट बँक ऑफ इंडियाचे होते आणि त्याला विजय माल्या त्याचबरोबर युनायटेड ब्रेवरिज होल्डिंग कंपनी हे जामीन होते. या कंपनीचे मुख्यालय ताब्यात घेतले असले तरी त्यातून ७ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज फिटेल की नाही याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. मात्र कर्जाचा मोठा हिस्सा या मालमत्तेच्या लिलावातून वसूल होऊ शकेल, असा विश्वास बँकेला वाटत आहे. उर्वरित हिश्श्याच्या वसुलीसाठी आणखी काय करावे यावर बँक विचार करत आहे.
किंगफिशर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजय माल्या हे आहेत आणि त्यांच्यावर या वसुलीसाठी आणखी जप्तीची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, अप्रत्यक्ष कर खात्याने माल्या यांच्या विरोधात सेवा कर बुडविल्याच्या प्रकरणात कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. या संबंधात लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अबकारी आणि आयात शुल्क मंडळाच्या सदस्या लिपिका मुजुमदार रॉय चौधरी यांनी दिली आहे. किंगफिशर कंपनीकडे सेवा कराची १९० कोटी रुपयांची बाकी आहे. त्यातल्या १२७ कोटी रुपयाच्या देण्यावरून न्यायालयात खटला जारी आहे.