डेहराडून – उत्तराखंडातील टेहरी डॅममध्ये पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपर्यंत पोचण्याची शक्यता असल्यामुळे टेहरीचे जिल्हाधिकारी नितेशकुमार झा यांनी धरणातून पाणी सोडण्याची तयारी सुरू केली आहे. धरणाचे पाणी नदीत सोडल्यास खालच्या बाजूला असणार्या उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधल्या नदीकाठच्या प्रदेशात पूर येण्याची शक्यता असून काठावरील लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तराखंडात पुन्हा पुराचे संकट
गेल्या जून महिन्यामध्ये उत्तराखंडात झालेल्या प्रचंड मोठ्या पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे भरपूर नुकसान झाले. परंतु तेव्हापासून म्हणजे जवळजवळ दोन महिने उत्तराखंडातल्या विविध नद्यांचे पाणी अजूनही कमी झालेले नाही. त्याचाच परिणाम होऊन टेहरी धरणात पाण्याची पातळी सातत्याने धोक्याच्या पातळीपर्यंत पोचत आहे. ८२५ मीटर ही धोक्याची पातळी आहे आणि गेल्या रविवारी रात्री पाण्याची पातळी ८१९ मीटर पर्यंत चढली होती.
ही पातळी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेपर्यंत ८१० मीटर एवढी होती, मात्र गेल्या आठ दिवसात ती ८ मीटरने वाढली आहे. या धरणामध्ये ९५० क्युसेक्स वेगाने विसर्ग येऊन मिसळत आहे. परंतु त्यामुळे सतत पातळी वाढण्याचा धोका विचारात घेऊन ११०० क्युसेक्स या वेगाने धरणातून पाणी सोडले जात आहे. गंगेला येणार्या पाण्यामुळे हे व्यवस्थापन करावे लागत आहे.