इराकमध्ये बॉम्बस्फोटात ६९ ठार

बगदाद – इराकमध्ये रमजान ईदच्या दिवशी झालेल्या अनेक स्फोटांमध्ये ६९ लोक ठार झाले. गेल्या २० जुलै रोजी बगदाद शहरामध्ये अशाच प्रकारे बॉम्बस्फोटांची मालिका झाली होती आणि त्यात ७१ लोक मारले गेले होते. गेल्या एप्रिलमध्ये सुनी मुस्लिमांच्या एका निषेध सभेच्या विरोधात सरकारने केलेल्या कारवाईपासून इराकमध्ये हिंसाचार सुरू झाला असून त्यात अनेक लोक मरण पावले आहेत. एप्रिलपासून लहान-मोठ्या हिंसाचाराच्या घटना घडल्या, परंतु रजमानच्या महिन्यात घडलेल्या या दोन मोठ्या घटनांमध्ये १४० लोक मरण पावले.

इराकमध्ये शिया मुस्लिमांचे वर्चस्व आहे आणि शिया-सुनी वाद प्रचंड वाढलेला आहे. हा वाद मिटला नाही तर देशामध्ये केवळ हिंसक घटनाच घडतील आणि बॉम्बस्फोटच होतील असे नाही तर २००६ आणि २००७ या दोन वर्षात इराकमध्ये जसे यादवी युद्ध झाले तसे आता पुन्हा होऊ शकेल, अशी भीती लोकांमध्ये व्यक्त केली जात आहे.

काल इराकमध्ये झालेले स्फोट इराकबरोबरच नजिकच्या शहरांमध्येही झाले. टुझ खोर्मेटो या औद्योगिक वसाहतीमध्ये कारबॉम्बचे स्फोट होऊन अनेक लोक मारले गेले. त्याशिवाय नजिकच्या परिसरात अनेक छोटे-मोठे स्फोट झाले. या सर्व स्फोटांत ६९ लोक मारले गेले.