रॉबर्ट वाड्रा यांची कागदपत्रे बनावट

चंडीगढ – कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी हरियाणातील गुडगांव येथील चार एकर जमीन खरेदी करताना खोटी कागदपत्रे सादर केली आणि तिथे व्यावसायिक तत्वावर घर बांधणी करून प्रचंड पैसा कमावला, असा आरोप हरियाणातील वादग्रस्त आय.ए.एस. अधिकारी अशोक खेमका यांनी पुन्हा एकदा केला आहे. या संबंधात हरियाणाच्या सरकारने गेल्या ऑक्टोबर महिन्यात एक चौकशी समिती नेमली होती. या समितीसमोर आपले म्हणणे सादर करण्याची संधी खेमका यांना देण्यात आली तेव्हा त्यांनी समितीसमोर कागदपत्रांचे एक बाडच सादर केले आणि त्यात हे आरोप केले.

रॉबर्ट वाड्रा यांना बांधकामाचा परवाना देताना हरियाणाच्या शहरी आणि ग्रामीण विकास नियोजन मंडळाने बनावट कागदपत्रांकडे दुर्लक्ष केले आणि अनेक नियम पायदळी तुडवून वाड्रा यांना अधिक नफा होईल अशी व्यवस्था केली, असाही आरोप खेमका यांनी केला आहे. दरम्यान, कॉंग्रेस पक्षाने हे आरोप नाकारले असून या आरोपामागे भारतीय जनता पार्टीचा हात असल्याचे म्हटले आहे.

गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये अशोक खेमका यांनी रॉबर्ट वाड्रा यांचे काही अवैध व्यवहार आपल्या अधिकारात रद्द केले होते आणि हरियाणातल्या कॉंग्रेसच्या सरकारची नाराजी ओढवून घेतली होती. त्यांची त्याबद्दल ताबडतोब बदलीही करण्यात आली. तिच्या विरोधात त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रारही केली होती. कारण त्यांची ही बदली तिथे नियुक्ती झाल्यानंतर केवळ आठ महिन्यात करण्यात आली होती. मात्र त्यांच्या तक्रारीची दखल न घेता त्यांची बदली करण्यात आली.

या प्रकरणात कॉलनी बांधण्याचे परमीट देण्यात बराच मोठा घोटाळा झाला असल्याचा त्यांचा आरोप आहे आणि अशाच प्रकारच्या घोटाळ्यातून रॉबर्ट वाड्रा यांनी ३ लाख ६० हजार कोटी रुपये मिळवले असावेत असा कयास केला आहे. कारण त्यांनी जमिनी स्वस्तात मिळवल्या आणि त्या जागेवर इमारती उभारण्याचा परवाना सत्तेचा वापर करून स्वस्तात मिळवला आणि तो परवाना नंतर डीएलएफ या कंपनीला प्रचंड किंमत घेऊन विकला आहे.