नवी दिल्ली – सोन्याची आयात वाढू नये आणि त्यापायी होणारा डॉलर्सचा खर्च कमी व्हावा यासाठी केंद्र सरकारने सोन्यावरचा आयात कर वाढवला असला तरी सोन्याची आयात कमी होत नाही. चोरट्या मार्गाने ती केली जात आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यात केंद्राच्या कस्टम खात्याने ८४ कोटी रुपयांचे चोरटे सोने पकडले आहे. त्यावरून सोन्याच्या चोरट्या आयातीला गती आल्याचे मानले जात आहे. २०१२-१३ या पूर्ण आर्थिक वर्षात एवढे चोरटे सोने हस्तगत करण्यात आले होते. म्हणजे गेल्या वर्षभरात जेवढी सोन्याची तस्करी झाली तेवढ्या सोन्याची तस्करी यावर्षी केवळ चार महिन्यात झाली आहे.
भारतात सोन्याच्या तस्करीत वाढ
चालू वर्षी हस्तगत करण्यात आलेले चोरटे सोने १८१ किलो आहे. सरकारने सोन्यावरचे आयात शुल्क वाढविल्यामुळे जर सोन्याची तस्करी वाढत असेल तर आयात कराच्या वाढीचा फेरविचार केला जावा, अशी मागणी काही लोक करतात. परंतु केंद्र सरकारने या धोरणाचा फेरविचार न करण्याचा निर्धार केला आहेच, पण सोन्याच्या तस्करी विरुद्ध सुद्धा कडक पावले उचलण्याचे ठरवले आहे.
सोन्यावरचे आयात शुल्क वाढविण्यामागे सोन्याची आयात कमी व्हावी हा हेतू आहे आणि तो साध्य होत आहे. गेल्या तीन महिन्यात सोन्याची कायदेशीर आयात बरीच घटली आहे. एप्रिल महिन्यात भारतात १४१ टन सोने आयात झाले होते. मे मध्ये त्यात वाढ झाली आणि १६२ टन सोने आयात करण्यात आले. मे च्या शेवटी आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा जूनमध्ये सोन्याची आयात ४५ टनावर खाली आली आणि जुलैमध्ये ती ३१ टनावर खाली आली. एकंदरीत आयात घटल्यामुळे परदेशी चलन बचत होणार आहे आणि सरकारचा आयात शुल्क वाढविण्यामागचा हेतू सफल होणार आहे. सोन्याच्या अधिकृत आयातीत झालेल्या या १०० टनापेक्षाही अधिक घटीच्या तुलनेत चार महिन्यात झालेली १२१ किलो सोन्याची चोरटी आयात फारच अत्यल्प असल्यामुळे तिच्यावरून आयात कराविषयीचे धोरण बदलण्याचा सरकारचा विचार नाही.