नरेंद्र मोदींची आज हैदराबादमध्ये रॅली

हैदराबाद: भाजपचे निवडणूक प्रचारप्रमुख तथा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची रविवारी हैदराबादमध्ये रॅली होत आहे. या रॅलीचे नाव ‘नवभारत युवाभेरी’ असे ठेवण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी चार वाजता सुरु होईल. या रॅलीच्या माध्यमातून मोदी २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची औपचारिक सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात असल्याने या रॅलीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

ही बहुप्रतिक्षीत रॅली लाल बहादूर शास्त्री स्टेडियमपासून सुरु होणार आहे. यामध्येर एक लाखहून अधिक लोक सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे भाजपनेही या रॅलीसाठी जोरदार तयारी केली आहे. याकडे सर्वोचे लक्ष लागले आहे.

मोदींच्या या रॅलीसाठी ५ रुपये तिकीट आकारणी झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. नरेंद्र मोदी आज सकाळी दहा वाजता हैदराबादमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ ते २ पर्यंत मोदी यंग प्रेसिडेन्ट ऑर्गनायझेशनच्या सदस्यांशी संवाद साधतील. रॅलीच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद पोलिसांनी संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.