जगनमोहन रेड्डी यांचा खासदारकीचा राजीनामा

हैदराबाद – वाय.एस.आर. कॉंग्रेसचे अध्यक्ष वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी कडप्पा लोकसभा मतदारसंघाच्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. केंद्र सरकारने तेलंगण राज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या मातोश्री आणि वाय.एस.आर. कॉंग्रेसच्या मानद अध्यक्ष वाय.एस. विजया या आंध्र विधानसभेच्या सदस्य आहेत. त्यांनीही आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन केंद्र सरकारच्या तेलंगण राज्य निर्मितीच्या एकतर्फी आणि मनमानी निर्णयाचा निषेध केला आहे.

या दोघांनीही तेलंगण निर्मितीला विरोध केला असला तरी त्या संबंधातले आपले निश्‍चित स्वरूपाचे धोरण काय आहे आणि एकंदरीतच या नव्या राज्य निर्मितीच्या बाबतीत पक्षाची भूमिका काय आहे हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. या दोघांनीही आपल्या राजीनाम्याची घोषणा उघडपणे केली आहे आणि सभापतींकडे आपले राजीनामे फॅक्सद्वारे पाठविले आहेत. पक्षाचे प्रवक्ते खासदार मेकापती राजमोहन रेड्डी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

जगनमोहन रेड्डी हे सध्या बेकायदा मालमत्ता संपादित केल्याच्या खटल्याच्या अनुरोधाने तुरुंगात आहेत. तिथून त्यांनी आपला राजीनामा पाठविला आहे. केंद्र सरकारच्या तेलंगण निर्मितीच्या निर्णयामुळे आंध्र प्रदेशात असंतोष निर्माण झाला आहे आणि जनता अस्वस्थ झालेली आहे, असे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. जनतेच्या या भावनेशी सहमत असल्याचे स्पष्ट करण्यासाठी आपण राजीनामे देत आहोत असे त्यांनी नमूद केले आहे.

तेलंगण निर्मिती करताना हैदराबाद ही उर्वरित आंध्र प्रदेशाची दहा वर्षांसाठी राजधानी असेल असे केंद्र सरकारने ठरवले आहे. परंतु दहा वर्षात राजधानी उभी करणे कसे शक्य आहे, असा प्रश्‍न रेड्डी यांनी राजीनाम्यात विचारला आहे. हैदराबाद ही राजधानी उभी करण्यास आणि तिथल्या सार्‍या सेवांचा विकास करण्यास ६० वर्षे लागली आहेत याचा सरकारने विचारच केलेला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.