जीएम सीड्सना परवानगी देण्याची मागणी

चंडिगढ – जैव तंत्रशास्त्रीय बदल केलेल्या (जीएम) बियाणांना भारतात वापरण्यास अनुमती देण्यात यावी अशी मागणी पंजाब आणि हरियाणातल्या शेतकर्‍यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. या बियाणांच्या वापराने शेतीचे उत्पादकता वाढेल आणि शेतकर्‍यांची परिस्थिती सुधारेल. पंजाबमधील ऑल इंडिया कॉर्डिनेट कमिटी ऑफ फार्मर्स असोसिएशनस्, त्याचबरोबर फतेहाबाद किसान क्लब आणि नवजवान किसान क्लब या संघटनांनी केंद्र सरकारला पाठवेल्या निवेदनात ही मागणी केली आहे.

सध्या शेतकरी फार वाईट अवस्थेत आहेत. वेळेवर शेतमजूर मिळत नाहीत, मजुरीचे दर वाढलेले आहेत, जंतुनाशकांच्या किंमती वाढल्या आहेत, पिकांवर बुरशीसारखे रोग पडून सातत्याने नुकसान होत आहे. त्याचबरोबर पाऊस आणि पाणी यांची अनिश्‍चितता वाढलेली आहे. इत्यादी अडचणींवर मात करून शेतकरी कसाबसा हा व्यवसाय करत आहेेत. त्यांना जीएम बियाणे वापरायला मिळाले तर या समस्यांमधून त्यांची सुटका होईल. बीटी कॉटन या कापसाच्या जीएम बियाणाचे असे सर्व परिणाम दिसून आलेले आहेत आणि या बियाणांमुळे शेतकर्‍यांचे खर्च कमी होऊन उत्पादन वाढले आहे.

जीएम बियाणांमध्ये रोगप्रतिकारशक्ती आयतीच असते. त्यामुळे शेतकर्‍यांचे पिकांवर विषारी औषध फवारण्याचे कष्ट वाचतात. अशा प्रकारचे जीएम बियाणे दाळी, मोहरी, मका इत्यादी पिकांमध्ये विकसित करण्यात आलेले आहेत. भारत देश दाळी आणि तेलबियांच्याबाबतीत अजूनही स्वावलंबी झालेला नाही. ते स्वावलंबन जीएम बियाणांच्यामुळे साधता येईल असे या शेतकरी संघटनांनी म्हटले आहे.

Leave a Comment