पाकिस्तानकडून पुन्हा भारतीय सीमेवर गोळीबार

नवी दिल्ली – पाकिस्तानी लष्कराने शुक्रवारी रात्री पूंछ भागातील भारतीय सीमेवर पुन्हा गोळीबार केला असल्याचे वृत्त आहे. पूंछ सीमेवरील दुर्ग बटालियन भागात सतत सात तास पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला, त्याला भारतीय जवानानी प्रत्युत्तर दिले असल्याचे आणि या गोळीबारात भारतीय सैनिकांची जिवीतहानी झाली नसल्याचे लष्कराचे प्रवक्ते एस.एन. आचार्य यांनी सांगितले.

आचार्य म्हणाले की शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास या भागातील अनेक चौक्यांवर पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केला. बंदुकांच्या सात हजार फैरी यावेळी पाक लष्कराने झाडल्या. छोट्या स्वयंचलित बंदुकांतून हा गोळीबार केला गेला. भारतीय सेनेने त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

चार दिवसांपूर्वीच पूंछ भागातच भारतीय हद्दीत ४०० मीटर आत घुसून पाक सेनेने पाच भारतीय जवानांना ठार केले होते. त्यामुळे भारत पाकमधील तणाव वाढला असतानाच पुन्हा गोळीबारची घटना घडली आहे. हे शस्त्रसंधीचे उल्लंघनच असल्याचे लष्कराचे म्हणणे आहे.