अमेरिकन खासदाराकडून स्नोडेनची म.गांधीशी तुलना

वॉशिग्टन – अमेरिकेतील सत्ताधारी डेमोक्रॅटीक पक्षाचे वरीष्ठ खासदार जॉन लेविस यांनी अमेरिकेच्या हेरगिरीचा पर्दाफाश करणार्‍या एडवर्ड स्नोडेनची तुलना महात्मा गांधीशी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी स्नोडेन राष्ट्रभक्त नसल्याचे विधान एकीकडे केले आहे तर दुसरीकडे लेविस त्याला अहिंसामार्गाने लढणारा म्हणून गौरवत आहेत.

अमेरिकी नागरिकांच्या हक्कासाठी लढणारे अशी जॉन लेविस यांची प्रतिमा आहे. ते म्हणतात स्नोडेनने अमेरिकेची गुपिते फोडून सविनय आज्ञाभंगाची परंपरा कायम राखली आहे. एखादी गोष्ट चुकीची आहे अशी खात्री असेल तर त्याविरोधात उभे राहण्यासाठी हेन्री डेव्हीड थोरेा आणि महात्मा गांधी यांनी अहिंसेचाच स्वीकार केला होता. विवेक सांभाळून कायद्याची अवज्ञा अशा वेळी करावी लागली तरी तो प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. स्नोडेनचाही हा एकप्रकारे सविनय कायदेभंग आहे. अर्थात त्यासाठी मोजावी लागणारी किंमत चुकती करण्याची तयारीही ठेवावीच लागते असेही ते म्हणाले.

काँग्रेस सदस्य आणि क्रांतिकारक मार्टिन ल्यूथर किंग यांच्या जिवंत असलेल्या सहकार्‍यांपैकी एक असलेले जॉन लेविस यांनी साठच्या दशकांत त्यांनाही अन्यायाविरोधात आवाज उठविल्याबददल ४० वेळा अटक झाली होती असे सांगतानाच काँग्रेसमध्ये असल्यापासूनही चार वेळा अटक करण्यात आल्याचे सांगितले.