हाजीपूर – बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील लालगंज तालुक्यातील रामपूर बखरा या गावातल्या सरकारी शाळेत मध्यान्ह भोजनासाठी शिजविण्यात आलेल्या अन्नात पाल पडल्यामुळे हे अन्न खाणारे २७ विद्यार्थी विषबाधा होऊन आजारी पडले आहेत. त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हाजीपूर सदर या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असून त्यांना काही धोका नाही असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
मध्यान्ह भोजनात पाल, २७ विद्यार्थी आजारी
या संबंधात वैशालीच्या जिल्हाधिकार्यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पाल पडलेले हे अन्न खाल्ल्यानंतर मुलांनी पोट दुखत असल्याची तक्रार केली. काही मुलांना उलट्या व्हायला लागल्या. त्यामुळे ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस अधिकारी या घटनेची वेगळी चौकशी करत आहेत. ज्या अन्नामुळे ही विषबाधा झाली त्याचे नमुने संबंधित प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
गेल्या जुलैच्या १६ तारखेला बिहारमध्येच छाप्रा जिल्ह्यातल्या एका गावात मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्यामुळे २३ मुले मरण पावली आहेत. या घटनेनंतर देशाच्या विविध भागांमध्ये असेच प्रकार आढळून आल्यामुळे सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली आहे. नेमकी याच काळात ही घटना घडल्यामुळे तिच्यामुळे खळबळ माजली आहे.
