उपनिरिक्षक सचिन सुर्यवंशी यांची बदली

मुंबई- पोलिस उपनिरिक्षक सचिन सुर्यवंशी यांची सांगलीला बदली केली असली तरी आमदार मारहाण प्रकरणात न्याय मिळत नाही तोपर्यंत बदलीच्या ठिकाणी जाणार नाही, अशी भूमिका सुर्यवंशी यांनी घेतली आहे. वांद्रे-वरळी सी-लिंकवर आमदार क्षितिज ठाकूर यांची गाडी अडवणारे वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरिक्षक सचिन सुर्यवंशी यांची बदली सांगली पोलिस प्रशिक्षण केंद्रात केली आहे.

नियमांनुसार सुर्यवंशी यांना 24 तासांत पोलिस प्रशिक्षण केंद्रात रुजू व्हावे लागेल. मात्र, सी-लिंक वाद आणि आमदार मारहाण प्रकरणात न्याय मिळत नाही पर्यंत बदलीच्या ठिकाणी जाणार नाही, अशी भूमिका सुर्यवंशी यांनी घेतली आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू असताना सचिन सुर्यवंशी यांनी सी-लिंकवर बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांची गाडी अडवली होती. ठाकूर यांनी वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले होते. परंतु, आमदार असल्याचे सांगून ठाकूर यांनी सुर्यवंशी यांच्याशी वाद घातला होता.

या प्रकरणाचे तीव्र पडसाद विधिमंडळात उमटले होते. सूर्यवंशी यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याची मागणी आमदारांनी केली होती. त्याच प्रस्तावाबाबत आपली बाजू मांडण्यासाठी विधानभवनात आलेल्या सूर्यवंशींना क्षितीज ठाकूर यांच्यासह पाच आमदारांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच गाजले. पाचही आमदार आणि सुर्यवंशी यांना काही काळासाठी निलंबित केले होते.

क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांना तर अटकही झाली होती. त्यानंतर या सर्व आमदारांचे निलंबनं मागे घेण्यात आले. तसेच सचिन सूर्यवंशीही गेल्या महिन्यापासून पुन्हा कामावर रुजू झाले होते. परंतु, शुक्रवारी सकाळीच त्यांना बदलीचे पत्र मिळाले आहे.

Leave a Comment