सिमला – हिमाचल प्रदेशाच्या नालागड परिसरात कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी युनूस खान यांनी वाळू तस्करांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडल्यामुळे त्रस्त झालेल्या वाळू तस्करांनी त्यांच्या अंगावर मालमोटार घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. बुधवारी या संबंधात पोलीस फिर्याद दाखल झाली आहे. युनूस खान हे योगायोगाने उत्तर प्रदेशातील वादग्रस्त सनदी अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांच्याच बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. युनूस खान यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या संबंधात दोघांना अटक करण्यात आली आहे.
हिमाचलात वाळू तस्करांचा अधिकार्यावर हल्ला
नालागड परिसरात बेकायदा वाळूचे उत्खनन मोठ्या प्रमाणावर केले जाते. परंतु युनूस खान यांनी या परिसरात उपजिल्हाधिकारी म्हणून कामाची सूत्रे हाती घेतली तेव्हा या वाळू माफियांच्या विरुद्ध कडक कारवाई सुरू केली. त्यामुळे हे बेकायदा उत्खनन करणारे गुन्हेगार संतप्त झाले असून त्यांनी युनूस खान यांचा काटा काढण्याचा प्रयत्न केला. गेल्या बुधवारी ते नदीच्या पात्रात उत्खनन करणार्या वाळू माफियांना अटकाव करण्यासाठी आपल्या सरकारी वाहनातून तिकडे गेले असता वाळू आणि खडीने भरलेला एक मालट्रक त्यांना दिसला. त्यांनी या मालमोटारीला थांबण्याचा इशारा दिला. परंतु मालमोटारीच्या चालकाने थांबण्याच्या ऐवजी युनूस खान यांच्या सरकारी वाहनावर आपली मालमोटार घातली.
युनूस खान यांच्या वाहन चालकाने मालमोटारीला चुकवले. त्यामुळे युनूस खान यांचे प्राण वाचले. परंतु ताबडतोबीने या मालमोटारीच्या चालकाला जेरबंद केले. पोलीस अधीक्षक संजयकुमार यांनी हा गुन्हा दाखल करून घेतला असून या उत्खननामागे असलेल्या मालमोटारीच्या मालकांना अटक करण्याची कारवाई सुरू असल्याचे सांगितले आहे.