विश्वास पाटीलांचे चोरीला गेलेले साहित्य सापडले

ठाणे- लेखक विश्वास पाटील यांच्या नव्या कादंबरीचे गुरूवारी चोरीला गेलेले साहित्य सापडले. ठाण्यातील मँजेस्टिक बुक स्टॉलसमोर पार्क केलेल्या गाडीतून पाटील यांची करड्या रंगाची ब्रिफकेस चोरीला गेली होती. यामध्ये `पाषाण झुंज` या पुस्तकाच्या ६०० पानांच्या हस्तलिखीताच्या तीन फाईल्स, ५०० पानांच्या हस्तलिखीत टिपणांच्या दोन वह्या आणि १५,००० हजार रूपये असा रोख असा ऐवज होता.

विश्वास पाटील यांनी लिखाण चोरीला गेल्याचे कळताच त्यांनी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत नौपाडा पोलिसांनी हस्तलिखीत शोधण्यासाठी तीन टीम तयार केल्या. त्यापैकी एका टीमला ठाणे रेल्वे स्थानकावर हस्तलिखीताची बॅग आढळून आली.

पाटील ठाण्यात एका पुरस्कार वितरणाच्या बैठकीसाठी आले होते. त्याआधी ते राम मारुती रस्त्यावरील मॅजेस्टिक बुक स्टॉलमध्ये काही पुस्तके खरेदी करण्यासाठी उतरले होते. कवी महेश केळुस्कर, ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ आदी यावेळी त्यांच्यासोबत होते. त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून ते खाली उतरले. त्यानंतर चालक प्रदीप सिंग याला एका महिलेने गाडीच्या बाजूला पैसे पडले असल्याचे सांगितले. ते पाहण्यासाठी सिंग खाली उतरले असताना गाडीचा दरवाजा उघडून चोरट्यांनी ब्रीफकेस चोरून नेली होती.