महिला बँकेच्या स्थापनेसाठी निधी मंजूर

नवी दिल्ली – केंद्र सरकारने २०१३-१४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केलेल्या राष्ट्रीय महिला बँकेच्या प्रत्यक्ष स्थापनेसाठी एक हजार कोटी रुपयांचे प्राथमिक भांडवल देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. अशा रितीने भारतीय महिला बँक लिमिटेड या नावाच्या या बँकेच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थ राज्यमंत्री नमोनारायण मीना यांनी राज्यसभेत काल एका प्रश्‍नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

या बँकेचे मुख्यालय दिल्लीत राहणार असून तिची सुरुवात सहा शाखांनिशी होणार आहे. या सहा शाखा देशाच्या उत्तर, दक्षिण, पश्‍चिम, मध्य आणि पूर्वोत्तर भारतामध्ये असतील आणि पाच वर्षानंतर तिच्या शाखांचा विस्तार केला जाईल. बँक सुरू झाल्यानंतरच्या पाच वर्षात ती नफ्यात येईल, अशी अपेक्षा आहे.

ही बँक केवळ महिलांसाठी असेल. महिलांना बँकेच्या मार्फत व्यवहार करण्याची सवय व्हावी आणि त्यांच्या उद्योगांना भांडवल पुरवता यावे यासाठी ही बँक काढण्यात आलेली आहे. सरकारने या बँकेला एक हजार कोटी रुपयांचे प्राथमिक भांडवल देण्यास आता मंजुरी दिली असली तरी तिचे प्रत्यक्षात कामकाज नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.