भारतावरील हल्ल्याबाबत शरीफ यांना खेद

इस्लामाबाद – गेल्या मंगळवारी पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसून, हल्ला करून पाच भारतीय जवानांची हत्या केली. या घटनेबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी खेद व्यक्त केला आहे आणि या घटनेचा या दोन देशातील संबंधांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे. पुढच्या महिन्यात न्यूयॉर्क येथील उभय देशांच्या पंतप्रधानांची अपेक्षित असलेली भेट या ताणलेल्या संबंधांमुळे अनिश्‍चितेच्या भोवर्‍यात सापडली आहे. परंतु नवाज शरीफ यांनी ही भेट होईल, अशी आशाही व्यक्त केली आहे.

संयुक्त राष्ट्र आम सभेच्या परिषदेला डॉ. मनमोहनसिंग आणि नवाज शरीफ दोघेही उपस्थित राहणार आहेत आणि तिथे या दोघांची भेट होण्याची अपेक्षा आहे. अशा भेटीतून संबंधात सुधारणा होण्याची शक्यता असल्यामुळे ती व्हावी अशी नवाज शरीफ यांची इच्छा आहे. मात्र भारतीय जनता पार्टीने, अशा परिस्थितीत भारताच्या पंतप्रधानांनी पाकच्या पंतप्रधानांशी चर्चा करू नये, असे सुचविले आहे.

हल्ल्याच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलवली आणि अशा घटनांमुळे दोन देशांतील तणाव वाढत असल्यामुळे पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा न ओलांडण्याचे पथ्य पाळले पाहिजे असे आवाहन केले. २००३ साली उभय देशांनी ताबा रेषेवर युद्धबंदी जाहीर केली होती. ती २०११ पर्यंत पाळली गेली. त्यामुळे ताबा रेषेच्या नजिक असलेल्या खेड्यांमध्ये लोक रहायला आले आणि ते आठ वर्षे शांततेत जगत होते. परंतु २०११ नंतर पाकिस्तानी सैनिकांनी ताबा रेषेवरची युद्धबंदी मोडून हल्ले सुरू केले आणि ते दरवर्षी वाढत आहेत. त्यामुळे या खेड्यातल्या लोकांमध्ये सुद्धा घबराटीचे वातावरण आहे.