नवी दिल्ली – भारतात कापसाच्या बीटी बियाणाला मंजुरी देण्यात आल्याच्या निषेधार्थ देशातल्या २० राज्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी दिल्लीतल्या जंतरमंतर रोडवर बीटी बियाणांच्या विरोधात निदर्शने केली. केंद्र सरकारने बीटी बियाणांच्या नियमनासाठी बायो टेक्नॉलॉजी रेग्युलेटरी ऍाथॅरिटी बीआरएआय ही यंत्रणा निर्माण करण्याचे ठरवले असून त्यासाठीचे विधेयक संसदेत सादर केलेले आहे. मात्र या विधेयकाला पर्यावरणवादी संघटनांचा विरोध आहे.
बीटी बियाणांच्या विरोधकांचा दिल्लीत मेळावा
अमेरिकेतल्या मोनसॅटो या कंपनीची अशा बीटी बियाणांच्या निर्मितीत मक्तेदारी असून त्यांच्यामुळे शेतकरी बियाणांच्या बाबतीत परावलंबी होत आहेत. म्हणून अशा परदेशी कंपन्यांना भारतात व्यवहार करण्यास बंदी करण्यात यावी अशी या पर्यावरणवादी संघटनांची मागणी आहे. काल त्यांनी दिल्लीत निदर्शने करून आपली मागणी पुढे रेटली.
या निदर्शकांनी बिगर बीटी कापसापासून आणि मोनसॅटोचे बियाणे न वापरता तयार केलेल्या कापसापासून, सुतापासून विणलेला जैविक तिरंगी झेंडा सोबत आणला होता. त्यावर तसा उल्लेख करण्यात आला होता. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी हा झेंडा येत्या स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावर फडकवावा आणि आपल्या देशाच्या कृषि विषयक स्वातंत्र्याची ग्वाही द्यावी अशी या निदर्शकांनी मागणी केली आहे.