पाच जणांच्या खुन्याच्या फाशीला स्थगिती

भोपाळ – मध्य प्रदेशातल्या मगनलाल बरेला या आपल्या पोटच्या पाच पोरींची हत्या करणार्‍या आरोपीला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने शेवटच्या क्षणी स्थगित केली आहे. फाशी देण्याच्या शेवटच्या क्षणी त्याची ही फाशी स्थगित झाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या आरोपीला दोन बायका असून आठ मुले आहेत. त्याच्या या बायकांनी त्याची फाशी रद्द व्हावी यासाठी जीवापाड प्रयत्न केले आहेत आणि फासावर लटकवण्याच्या काही तास आधी फाशीला स्थगिती मिळवली आहे.

मगनलाल बरेला हा सिहोर जिल्ह्यातील कानेर या गावचा रहिवाशी असून त्याने आपल्या पाच मुलींच्या हत्या केलेल्या आहेत. त्याच्या दोन बायका आणि मेव्हणे यांनी त्याच्या जमीन विकण्याच्या निर्णयाला विरोध केल्यामुळे तो चिडला होता. म्हणून त्याने आपल्या पाच लहान मुलींची हत्या केली. या पाच मुलीतली सर्वात मोठी मुलगी सहा वर्षांची होती आणि बाकीच्या मुली अगदी लहान होत्या. विळेचे घाव घालून त्याने या मुलींच्या हत्या केल्या.

त्याच्यावर आरोप सिद्ध झाला आणि त्याला फासावर लटकण्याचा आदेश देण्यात आला. त्याची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायम झाली. परंतु त्याला अजूनही आठ मुले आहेत आणि त्यांचे लालनपालन करण्यास दुसरे कोणीही नाही. तेव्हा त्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत करावी अशी मागणी करणारा अर्ज त्याच्या दोन बायकांनी सर्वोच्च न्यायालयात केला आणि त्याचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास तरी त्याच्या फाशीला स्थगिती दिली आहे.