पाकिस्तानात बॉम्बस्फोटात ३८ लोक ठार

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या क्वेट्टा शहरामध्ये गुरुवारी झालेल्या एका भीषण बॉम्बस्फोटात ३८ लोक ठार तर ५० लोक जखमी झाले. ठार झालेल्यांमध्ये तिघा पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे. क्वेट्टा हे शहर पाकिस्तानच्या वायव्य भागातील बलुचिस्तान या परगण्यातील राजधानी शहर आहे. बलुचिस्तान हा प्रांत दहशतवादी कारवायांनी पूर्ण त्रस्त आहे. पण गुरुवारच्या या भीषण स्फोटाने सामान्य लोकही हादरले आहेत.

बलुचिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक पोलीस कॉन्स्टेबल मारला गेला. तो आपल्या चार मुलांना घेऊन बाजारपेठेत गेला असता त्याच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्याला त्याच्या चारही मुलांसह मारून टाकले. या हवालदाराच्या अंत्ययात्रेमध्ये ३०० लोक सहभागी झाले होते. मात्र दहशतवाद्यांनी त्यांच्यावरही हल्ला केला, त्यात ३८ लोक मारले गेले.

अंत्ययात्रेवर झालेला हा हल्ला मानवी बॉम्बच्या साह्याने करण्यात आला. दिवंगत पोलीस कॉन्स्टेबलची अंत्ययात्रा सुरू असताना एक संशयित व्यक्ती तिच्या सुरुवातीलाच ती जिथून निघाली त्या मशिदीत शिरण्याचा प्रयत्न करत असताना काही पोलिसांना दिसला. त्याला काही पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने स्वत:च्या अंगाभोवती गुंडाळलेल्या बॉम्बचा स्फोट घडवला. या स्फोटात ठार झालेल्यांमध्ये पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपमहानिरीक्षक असे तीन वरिष्ठ अधिकारी आहेत. या अंत्ययात्रेत पोलीस मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, त्यामुळे ठार झालेल्यांत २१ पोलीस कर्मचारी आहेत.