मुंबई (प्रतिनिधी) – पाकिस्तानी सीमेवर पूंछ येथे मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान कुंडलिक माने यांना मृत्यू आला, असे विधान केल्यामुळे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे अडचणीत आले असून त्यांच्या या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे. असे बेभान विधान करणार्या गोपीनाथ मुंडे यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
गोपीनाथ मुंडे यांनी देशाची माफी मागावी वादग्रस्त वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी
शहीद कुंडलिक माने यांच्या अंत्यसंस्कारावेळी अनेक मंत्री व सरकारी अधिकारी उपस्थित होते. मात्र, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही हजर असते तर ते अधिक योग्य झाले असते. असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसविरोधी राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी गोळीबारात शहीद झालेले मराठा लाईट इन्फ्रंटीचे जवान कुंडलिक माने यांच्या पार्थिवावर त्यांच्या जन्मगावी पिंपळगाव बुद्रुक येथे आज अंत्यसंस्कार झाले.
त्यानंतर तेथे झालेल्या शोकसभेत अनेक नेत्यांनी भाषणे केली. त्यावेळी बोलताना भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी पाकिस्तानी सीमेवर पूंछ येथे माने यांना मृत्यू आला असे म्हटले. याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. वास्तवात पूंछ हा भारताचाच अविभाज्य भाग असून जम्मू-काश्मीरचा काही भाग पाकच्या ताब्यात आहे. अशी आपली पूंछ येथे सीमा नसून प्रत्यक्षात ताबारेषा आहे. या सार्याचे भान भाजपा नेत्याने न बाळगता विधान केले असून त्यामुळे भारताचीच जगात बदनामी होणार आहे. असे मलिक म्हणाले.
पाक अतिरेक्यांनी तो हल्ला केला, असेही मुंडेंचे विधान होते. अशाच अर्थाचे विधान संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांनी केले म्हणून भाजपाने गदारोळ करून संसदेचे काम ठप्प केले. आता मुंडे तसेच कसे काय बोलू शकतात. असाही सवाल मलिक यांनी केला. शहीद कुंडलिक माने यांच्या अंत्यसंस्कारासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री
हर्षवर्धन पाटील, स्थानिक आमदार व कामगारमंत्री हसन मुश्रीफ, विरोधी पक्षनेते तसेच अन्य नेते उपस्थित होते. मात्र, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी गैरहजर होते.
आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एका सोने-चांदी दुकानाच्या उद्घाटनासाठी हजर होते, याकडे पत्रकारांनी मलिक यांचे लक्ष वेधले असता त्यांनी सौम्य शब्दांत नाराजी व्यक्त केली. तेथे स्वतः मुख्यमंत्री हेही उपस्थित राहिले असते तर ते अधिक योग्य झाले असते. अशी भावना मलिक यांनी व्यक्त केली. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे.