नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आधुनिक काळातील माहिती प्रसारणाच्या माध्यमांची दखल घेऊन त्या माध्यमातून सरकारची माहिती जनतेपर्यंत पोचविण्यासाठी स्वतंत्र विभाग उघडण्यास मंजुरी दिली असून त्यासाठी २२ कोटी रुपये रक्कम निर्धारित केली आहे. या नव्या विभागाचे नाव न्यू मीडिया विंग असे ठेवण्यात आलेले आहे. सध्याच्या काळामध्ये यू ट्यूब, फेसबुक, ट्विटर आदि सोशल मीडियातून बरेच लोक जगाची माहिती घेत आहेत. मात्र माहिती आणि प्रसारण विभागाकडे या माध्यमांचा वापर करण्याची यंत्रणा नाही. म्हणून आधुनिक काळातील माध्यमांचा वापर करणारी यंत्रणा विकसित करण्याची गरज या खात्याला जाणवली.
केंद्र सरकारची नवी वाहिनी ‘न्यू मीडिया विंग’
माहिती आणि प्रसारण मंत्री मनिष तिवारी यांनी एका वृत्तसंस्थेला काल ही माहिती दिली. अशा प्रकारची यंत्रणा निर्माण करण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची सारी साधन सामुग्री वापरून हा नवा विभाग उभा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी आपल्या खात्याच्या संशोधन संदर्भ आणि प्रशिक्षण विभागाची पुनर्रचना करण्यात येईल आणि न्यू मीडिया विंगसाठी उत्तम प्रशिक्षित तरुण अधिकारी नेमले जातील, असे तिवारी यांनी सांगितले.
या नव्या विभागाचे प्रमुख म्हणून मंत्रालयातील संयुक्त सचिवांची नेमणूक केली जाईल. सरकारच्या प्रसिद्धीची नव्या सोशल मीडियातील जबाबदारी या विभागावर असेल, असेही तिवारी म्हणाले.