शास्त्रीय संगीत अभिनेत्री जयमाला शिलेदार यांचे निधन

पुणे, – गेल्या सात दशकांचा शास्त्रीय संगिताचा वारसा आणि बालगंधर्वांच्या बरोबर अभिनय केलेल्या ज्येष्ठ रंगकर्मी जयमाला जयराम शिलेदार यांचे आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पहाटे किडणीच्या विकाराने निधन झाले. त्या 88 वर्षाच्या होत्या. त्याच्या मागे त्यांच्या दोन कन्या ज्येष्ठ शुास्त्रीय नाट्य गायिका कीर्ती शिलेदार व दीप्ती भोगले असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी साडेबारा वाजता वैकुंठ स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी एकूण मराठीतील 46 नाटकात भूमिका केल्या होत्या. त्यानी एकूण सोळा नाटकांना संगीत दिले होते. एक्काहत्तर वर्षापूर्वी गोविंदराव टेंबे यांच्या वेषांतर या नाटकात संगीत नाट्यभूमीवर पदार्पण केलेल्या जयमालाबाई अगदी तीन चार महिन्यापूर्वीपर्यंत गात होत्या. त्यांचा प्रवासही सुरु होत्या. याच वर्षी त्यांना पद्मश्री हा किताबही मिळाला होता. मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने अध्यक्षा डॉ मालती वैद्य यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

त्यांचा जन्मही एका नाटककंपनीत झाला होता त्यामुळे त्यांना संगिताचा वारसा अगदी बाललेण्यासारखा मिळाला. इंदूरला त्यांचा जन्म दि.21 ऑगष्ट 1926 रोजी भाटेबुवांच्या ‘नाट्यकला प्रवर्तक’ या नाट्यकंपनीच्या बिर्‍हाडातच झाला होता. 1942 साली त्यांनी गोविंदराव टेंबे यांच्या वेषांतर या नाटकात काम करून संगीत रंगभूमीवर पदार्पण केले होते. 1945 साली मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्य महोत्सवात बालगंधर्व, केशवराव दाते, चिंतामणराव कोल्हटकर यांच्याबरोबर संगीत शारदा या नाटकात काम केले होते. 1947 साली धरणीधर या नाटकात काम करताना त्यांचा जयराम शिलेदार यांच्याशी परिचय झाला, पुढे त्याचे प्रेमविवाहात रूपांतर झाले. दि.10 ऑक्टोबर 1949 रोजी त्यांनी जयराम शिलेदार यांच्या समवेत मराठी रंगभूमी या नाट्यसंस्थेची स्थापना केली व तेंव्हापासून 35 वर्षे त्यांनी शास्त्रीय संगीत नाटकात नायिकेच्या भूमिका केल्या. 1987 या वर्षादरम्यान त्यांनी बालगंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संगीत नाटकाचे 125 प्रयोग केले होते. त्यांनी ज्या नाटकांना संगीत दिले त्या नाटकात बाळ कोल्हटकरांची मुंबईची माणसं, एखाद्याचं नशीब, मला निवडून द्या, प्रतिष्ठित भामटे तसेच वि रा हंबरडे यांची बाजीराव मस्तानी, कमळाच्या पाकळ्या, अठरा अक्षौहिणी, बा जावई बापू वा! त्याच प्रमाणे गो नि दांडेकर यांच्या मंदोदरी या नाटकांचा समावेश आहे. त्यांनी ज्या शास्त्रीय संगीत नाटकात महत्वाची भूमिका केली त्यात संगीत शारदा( भूमिका शारदा), संशय कल्होळ (रेवती), मृच्छकटिक (वसंतसेना ), भावबंधन (ललिता), एकच प्याला (सिंधू), संगीत स्वयंवर (महाराणी, रुख्मिणी ), मानापमान (भामिनी), विद्याहरण (देवयानी), द्रौपदी (भानुमती), संत कान्होपात्रा (कान्होपात्रा), मूकनायक (सरोजिनी), संगीत शांकुंतल (शकुंतला), बाजीराव मस्तानी (मस्तानी), अनंत फंदी (म्हाळसा), महाकवि कालिदास (सुमनावती),कृष्णार्जुनयुद्ध (सत्त्यभामा), कविराय राम जोशी (गंगाबाई), संगीत भैरवी (भैरवी) या भूमिका केल्या होत्या. त्यांनी 1974 साली नाट्य परिषदेचा बालगंधर्व पुरस्का, 1984 साली विष्णुदास भावे पुरस्कार, 1993 साली राज्यशासनाचा बालगंधर्व पुरस्कार, 1997 साली रंगत संगतचा जिंदादिल पुरस्कार, 98 मध्ये नाट्यदर्पणचा महिंद्र नटराज पुरस्कार, 2000मध्ये अल्फामराठीचा जीवनगौरव पुरस्कार, 2001मध्ये पुणे मराठी ग्रंथालयाचा कृष्णराव गोखले पुरस्कार मिळाला होता.

Leave a Comment