मोबाइल कनेक्शन साठी द्यावे लागणार ठसे

नवी दिल्ली – आता तुम्हाला मोबाइलचे सिम कार्ड घ्यायचे असेल तर फक्त ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा देऊन भागणार नाही. तर तुम्हाला तुमच्या हाताचे ठसेही द्यावे लागणार आहे. डीओटी म्हणजे दूरसंचार विभाग मोबाइल सिम विकत घेताना हाताच्या ठसे घेण्याचा पर्याय पडताळून पाहात आहे.यासंबंधीच्या सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आल्यानंतर दूरसंचार खाते त्यावर विचार करत आहे.

मोबाइल सिम विकत घेतानाच ग्राहकाला सर्व आवश्यक दस्तऐवजासोबत आता आपल्या हाताचे ठसे द्यावे लागणार आहेत. दूरसंचार मंत्री मिलिंद देवरा यांनी लोकसभेत केलेल्या लेखी निवेदनात ही माहिती दिली. केंद्रीय दूरसंचार आणि माहिती -तंत्रज्ञान मंत्री मिलिंद देवरा यांनी सांगितले की गृह मंत्रालयाकडून याबाबतचा प्रस्ताव आला आहे.

दूरसंचार मंत्रालयाकडे देशभरातील सर्व मोबाइल ग्राहकांची सूची आहे, त्यामध्ये आता बायोमेट्रिक परिमाणाची भर घालण्यात यावी, असा हा प्रस्ताव आहे. आम्ही त्याबाबतच्या सर्व शक्यता पडताळून पाहात आहोत. दूरसंचार मंत्रालयाकडे असलेला मोबाइल ग्राहकांचा डाटाबेस अधिक सक्षम करण्यासाठी ही योजना आहे. या प्रस्तावानुसार हाताचे ठसे किंवा त्यासारखंच अद्वितीय असलेले बायोमेट्रिक परिमाण मोबाइल ग्राहकाला नवीन कनेक्शन घेतानाच सादर करावं लागणार आहे, सध्या फक्त आधार कार्डासाठीच आपल्या हाताचे ठसे आणि डोळ्याच्या बाहुलीची प्रतिमा द्यावी लागते.

तसेच सध्याच्या नव्या नियमावलीनुसार मोबाइल सिम विकणार्‍या दुकानदाराने किंवा कंपनीने आम्ही ग्राहकाला प्रत्यक्ष पाहिलेले आहे, त्याने दिलेल्या दस्तऐवजांची खातरजमा केलेली आहे, असे प्रतिज्ञापत्रही द्यावे लागते, अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली. तसेच नवीन मोबाईल कनेक्शन घेण्यासाठी जे ग्राहक खोटी कागदपत्रे देतात, त्या ग्राहकांविरोधात पोलिसांत तक्रार नोंदविण्याच्या सूचनाही रिटेलर्सना असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment