पारलेचा बंगलोरमधील कारखाना बंद

बंगलोर – बिस्कीटे आणि कन्फेक्शनरी उत्पादक प्रसिद्ध कंपनी पारले प्रॉडक्टस यांनी त्यांचा बंगलोर येथील उत्पादन प्रकल्प ९ सप्टेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आणि कामगारांमध्ये दीर्घकाळ सुरू असलेल्या संघर्षामुळे हा निर्णय घेण्यात आला असून कर्नाटक सरकारनेही कारखाना बंद करण्यास संमती दिली असल्याचे समजते. कर्नाटक सरकारच्या कामगार विभागाकडून कंपनी बंद करण्याची ऑर्डर ३ ऑगस्ट रोजी देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

बंगलोर येथे २००१ साली पारले प्रॉडक्ट कंपनी सुरू करण्यात आली होती व त्यासाठी ७० कोटी रूपयांची गुंतवणूकही केली गेली होती. कंपनीत २५० कामगार आहेत. गेली दोन वर्षे कामगारांकडून सतत अडवणुकीचे धोरण स्वीकारले जात आहे आणि वारंवार संप पुकारला जात आहे. त्यामुळे कंपनीने १५ मार्च रोजी लागू केलेला लॉक आऊट अद्यापही सुरूच आहे. कामगार संघटना आणि व्यवस्थापन यांच्यातील संबंध चिघळत चालल्याने कंपनी बंद करण्यासाठी व्यवस्थापनाने लेबर विभागाकडे ६ जून रोजी अर्ज दिला होता असेही समजते.

Leave a Comment