सरकारी सेवांसाठी आधारकार्ड बंधनकारक नाही

नवी दिल्ली – बँकेत खाते उघडण्यासाठी, शाळेत प्रवेशासाठी आणि पासपोर्ट मिळवण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक नाही अशी महत्वपूर्ण माहिती नियोजन
मंत्री राजीव शुक्ला यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली. मात्र घरगुती वापराच्या गॅसवर अनुदान मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांचा आधार कार्ड क्रमांक बँकेत नोंदवणे आवश्यक आहे असे शुक्ला यांनी सांगितले.

अनुदानाची रक्कम जमा होण्याची योजना सुरु झाल्यानंतर तीन महिन्यात ग्राहकांना त्यांचा आधार क्रमांक बँकेत नोंदवावा लागणार आहे. एलपीजी ग्राहकांच्या खात्यात थेट अनुदानाची रक्कम जमा होण्याची योजना 20 जिल्ह्यात सुरु झाली आहे. लवकरच देशाच्या अन्य भागातही ही योजना सुरु करण्यात येणार आहे.

घरगुती गॅस बाजारभावाने मिळवण्यासाठी आधारकार्ड बंधनकारक नसल्याचे राजीव शुक्ला यांनी सांगितले. यावर्षी 26 जुलैपर्यंत 39.36 कोटी आधारकार्डाची नोंदणी झाल्याची माहिती शुक्ला यांनी दिली.