‘फिक्सिंग’ला फौजदारी गुन्हा ठरवा- द्रवीड

नवी दिल्ली- आगामी काळात सक्षम कायदा झाल्यास ‘फिक्सिंग’ला पूर्णपणे आळा बसण्या्स मदत होईल. ‘मॅचफिक्सिंग’ आणि ‘स्पॉटफिक्सिंग’ला फौजदारी कायद्याच्या कक्षेत आणा, अशी मागणी भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने केली आहे.

मुलाखतीप्रसंगी पुढे बोलताना राहूल म्हणाला, ‘मॅचफिक्सिंग’ आणि ‘स्पॉटफिक्सिंग’ रोखण्यासाठी फौजदारी कायद्याच्या कक्षेत आणण्यासह ‘फिक्सिंग’च्या दुष्परिणामांबाबत युवा क्रिकेटपटूंना अवगत करण्याला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. युवा क्रिकेटपटूंना फिक्सिंगचे दुष्परिणाम समजावून सांगण्याची तसेच त्याबाबत समुपदेशन करण्याची गरज आहे, असे मला वाटते.

काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने ‘मॅचफिक्सिंग’ रोखण्याबाबत पावले उचललीत. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकातर्फे युवा क्रिकेटपटूंना समुपदेशनही करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावरच नव्हे तर देशांतर्गत स्पर्धेतही खेळणा-या क्रिकेटपटूंना ‘फिक्सिंग’चे दुष्परिणाम समजावून सांगितले जात आहेत असेही द्रविडने यावेळी बोलताना स्पष्ट केले.

युवा क्रिकेटपटूंना समुपदेशन करण्यासह ‘फिक्सिंग’ रोखण्यासाठी मजबूत आणि सक्षम कायदा करण्याची आवश्यकता असून सायकलिंगमधील ‘डोपिंग’चे उदाहरण घेऊ. उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी जगप्रसिद्ध सायकलिस्ट लान्स आर्मस्ट्राँगवर कडक कारवाई झाली. त्यामुळे ‘डोपिंग’ वाईट आहे, हे जगभरातील सायकलपटूंना कळून चुकले. जागतिक सायकलिस्ट संघटनेच्या धडक कारवाईमुळे सायकलिस्ट धास्तावले आहे. अब्रू जाण्यासह पोलिस कारवाईमुळे अनेकांनी ‘डोपिंग’पासून दूर राहणे पसंत केले असल्याचेही यावेळी राहूल म्हणाला.