गुमी – द. कोरिया – दक्षिण कोरियाने गुमी शहरात इलेक्ट्रीफाईड रस्त्याचे टेस्टींग सुरू केले आहे. या मुळे इलेक्ट्रिकवर चालणार्या वाहनांना प्रवासादरम्यानच गाडीच्या बॅटरी चार्ज करता येणार आहेत. रस्यात पुरलेल्या केबलच्या सहाय्याने हे चार्जिंग शक्य होणार आहे. परिणामी सध्याच्या इलेक्ट्रिक गाड्यांसाठी ज्या आकाराच्या बॅटरीज वापराव्या लागतात, त्याच्या १/५ आकाराच्या बॅटरीज या वाहनांसाठी पुरेशा होऊ शकणार आहेत.
कोरिया अॅडव्हान्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजीने ही प्रणाली विकसित केली आहे. गुरूवारपासून पुढील चार महिने २४ किमीच्या इलेक्ट्रीफाईड रस्त्याच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी इलेक्ट्रीक वाहनाला ऑनलाईन इलेक्ट्रीकल व्हेईकल उपकरण बसवावे लागणार आहे. हे उपकरण रस्त्याखाली पुरलेल्या पट्ट्यांमधून वीज खेचून घेईल आणि ती बॅटरीला पुरवेल. प्रत्यक्ष संपर्क न येताच हे चार्जिंग केले जाणार आहे.
यामुळे ट्राम, ट्रोली बस वाहनांसाठी वापरले जाणारे पारंपारिक ओव्हरहेड वायर्स वापरण्याची गरज राहणार नाही तसेच रस्त्यात फार मोठे बांधकाम करण्याचीही गरज नाही कारण बस स्टॉपच्या जागेतच या पट्ट्या बसविल्या जाणार आहेत. अर्थात त्यासाठी वापरावे लागणारे ऑनलाईन इलेक्ट्रीकल व्हेईकल उपकरण सध्या तरी खूपच महाग म्हणजे ७०० दशलक्ष वॉन इतक्या किमतीला आहे. मात्र उत्पादक कंपनी या उपकरणाची किंमत आवाक्यात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे कंपनीचे मॅनेजर पार्क जाँग र्हाेन यांनी सांगितले. ते म्हणाले की किमती आवाकयात आल्या की बहुतेक सर्व शहरांत ही नवी वाहतूक व्यवस्था सुरू केली जाणार आहे.