देशाच्या संरक्षणासाठी प्राणार्पण करणार्या शूर सैनिकांची आपण आठवण ठेवली पाहिजे. त्यांचे स्मारक उभे केले पाहिजे पण आपण त्यांना विसरून जातो आणि त्यांच्या बाबतीत, नाही चिरा नाही पणती असे म्हणण्याची वेळ येते. आपण असे कृतघ्न का होतो ? असे जवान कुर्बान होतात आणि कालांतराने त्यांची आठवण रहात नाहीच पण निदान त्यांचे हौतात्म्य ताजे असताना तरी त्यांच्याविषयी चांंगले बोलले पाहिजे पण बिहारच्या भीमसिंग या मंत्र्याला तेवढेही तारतम्य राहिले नाही. पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांचे अजून अंत्यविधीही झाले नाहीत तोच त्यांनी सैनिकांविषयी तुच्छता व्यक्त करणारे प्रलाप काढले. देशातले हे तरुण देशाच्या संरक्षणासाठी आपली सर्वात किंमती बाब म्हणजे जीव पणाला लावतात. म्हणूनच त्याला परमोच्च त्याग किंवा सुप्रिम सॅक्रिफाईस असे म्हटले जाते. त्यांच्या मरणाला आपण वीर मरण किंवा हौत्मात्म्य असे म्हणतो कारण ते आपल्या स्वत:च्या स्वार्थासाठी मेलेले नसतात तर दुसर्यांसाठी, मातृभूमीसाठी आणि देशवासीयांच्या संरक्षणासाठी मरत असतात. हे जवान डोळ्यात तेल घालून आपल्या सीमेचे रक्षण करतात म्हणून आपण सुखाची झोप घेऊ शकतो. आपल्या तोंडातला घास कधी त्यांच्यासाठी ओठात अडत नाही.
जरा याद करो…….
त्यांच्या वाट्याला जे हाल येतात त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. भारत-पाक सीमेवर एवढी कडाक्याची थंडी असते की, पोटासाठी एखादा अन्न पदार्थ हातात घेतला तर त्याचाही बर्फ होतो. त्यांच्या कुटुंबियांची स्थिती तर किती हलाखीची असते याला काही पारावार नाही. तेही भारत मातेचे पुत्र असतात आणि आपणही याच देशाचे नागरिक असतो पण शत्रूने केलेल्या हल्ल्यात त्यांनीच का मरावे ? आपण का मरू नये असा विचारही आपल्या मनात येत नाही. आपण त्या हालात देशाचे रक्षण करायला जात नाही पण निदान त्यांचा मान तरी राखायला हवा. त्यांना हौतात्म्य प्राप्त होते तेव्हा त्यांच्या विषयी निदान चार शब्द तरी चांगले बोलायला हवेत पण आपल्या देशातल्या मंत्र्यांची डोकी एवढी सटकली आहेत की त्यांना हे जवान आपले प्राण देतात त्याचे काहीच वार्ईट वाटत नाही. पाच जवान मारले जातात तेव्हा आपले संरक्षण मंत्री ही बाब इतकी सहजपणे घेेतात की त्यांना या घटनेची सामान्य माणसाच्या मनात निर्माण झालेली चीडही ध्वनित करता येत नाही.
या घटनेला पाकिस्तानातले अतिरेकी कारणीभूत असोत की पाकिस्तानचे लष्कर कारणीभूत असो शेवटी ती जबाबदारी पाकिस्तानच्या सरकारची असते आणि त्याबद्दल पाकिस्तान सरकारलाच जाब विचारला पाहिजे. पण पाच जणांच्या हौतात्म्याचा प्रश्न त्यांनी, हे तर अतिरेक्यांचे कृत्य आहे अशा शब्दात निकाली काढले. त्यामुळे कशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त होईल याची त्यांना साधी कल्पनाही आली नाही. देशाच्या पाच जवानांचे प्राण ही साधी गोष्ट मानण्याची प्रवृत्ती या विधानांमागे असते. पण त्यावरून बराच गलबला झाल्यावर संरक्षण मंत्र्यांना आपण काय करून बसलो याची जाणीव झाली. शहीद झालेल्या पाच जवानांतील चौघे बिहारचे होते. आता लष्करातल्या जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले तर त्यांचे पार्थिव देह त्यांच्या गावी पाठवले जायला लागले आहेत. कारगिलच्या युद्धानंंतर ही प्रथा पडली. त्यापूर्वी शहीद झालेेला जवान दुर्गम भागात मृत झाला असेल तर त्याचा मृतदेहही शोधला जात नसे. त्याच्या कुटुंबियांना तो देशाच्या कामी आला असल्याचा संदेश तेवढा पाठवला जात असे पण वाजपेयी सरकारने ही प्रथा सुरू केली. बिहारमधील त्या चार जवानांचे मृतदेह पाटण्यात विमानाने आणण्यात आले तेव्हा त्यांना घ्यायला राज्य सरकारचा एखादा मंत्रीही हजर नव्हता आणि अधिकारीही सरकारचा प्रतिनिधी म्हणून हजर नव्हता. ही बाब पत्रकारांना खटकली. त्यावर राज्यातले एक मंत्री भीमसिंह यांना पत्रकारांनी काही विचारले असता त्यांनी आपल्या अकलेले तारे असे काही तोडले की, आपली सर्वांची मान शरमेने खाली झुकावी.
ते म्हणाले लढताना मेले म्हणून काय नवल झाले ? नाही तरी सैनिक आणि पोलीस मरण्यासाठीच तर असतात. त्याच्या स्वागताला जाण्याची काय गरज ? पत्रकारांना तर आश्चर्याचा धक्काच बसला. या मंत्र्याला कदाचित माहीत नसेल की लष्करात जाणारे जवान मरण्यासाठी नाही तर मारण्यासाठी जात असतात. त्यांनाही या मंत्र्याप्रमाणे चारही बाजूंनी पैसा मिळवून गबर होता येते पण अशा मार्गाने देशभक्तीचे भ्रष्ट दर्शन घडवण्यापेक्षा आपण आपल्या देशासाठी तळहातावर शिर घेऊन लढावे अशा भावनेने ते पेटलेले असतात. पण हे मंत्री म्हणतात ते तर मरायलाच लष्करात गेलेले असतात. ही तफावत का पडते ? कारण लष्करात जाणारा जवान ज्या भावनेेने लष्करात जात असतो त्या देशभक्तीच्या भावनेचा या मंत्र्यांच्या आणि टिनपाट पुढार्यांच्या मनाला स्पर्शही झालेला नसतो. ते राजकारणात समाजाच्या हितासाठी आलेले नसतात. त्यामुळे त्यांना आपल्या जवानांचे हौतात्म्य हो कस्पटासमान वाटत असते. जनतेत त्यांच्या अशा बोथटपणाची चर्चा होते तेव्हा त्यांना लक्षात येते की आपण काय करून बसलो. नंतर ते माफी वगैरे मानतात पण ते आधी आपल्या प्रवृत्तीनुसार बोलून गेलेले असतात. अशा जवानांचे हौतात्म्य ताजे असताना या लोकांची ही भावना असते पण ते जुने झाल्यावर त्यांच्यासह सारा समाजच हौतात्म्याला विसरून जातो आणि या विस्मरणाच्या खुणा म्हणून अनेक गावात त्यांची न झालेली अर्धवट स्मारके उभी असतात.