एनआरआयनी दिली अम्मा जयललितांना पसंती

नवी दिल्ली – तमीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना अनिवासी भारतीयांनी पुढील पंतप्रधान म्हणून सर्वाधिक पसंती दिली असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. एनआरआय पोलिटिकल रिसर्च रिपोर्ट या नावाने केल्या गेलेल्या या सर्वेक्षणात सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडा, सिंगापूर सह आठ देशातील ५००० हून अधिक अनिवासी भारतीयांची मते नोंदविण्यात आली आणि त्यांना दहा प्रश्न विचारण्यात आले होते असे मोहदीन पिचाई यांनी सांगितले.

या सर्वेक्षणानुसार जयललिता पुढील पंतप्रधान होण्यास ८६ जणांनी पसंती दर्शविली. त्या खालोखाल गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना ८१ टक्के लोकांनी मते दिली तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ५३ जणांनी पसंती दिली. अन्य नेत्यांत बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवानी सर्वेक्षणात समाविष्ट होण्यासाठीचे किमान अंकही मिळवू शकले नाहीत असे समजते.

पंतप्रधानपदासाठी दहा मानके सर्वेक्षणात निश्चित करण्यात आली होती. त्यात शिक्षण, अनुभव, जनाधार, आंतरराष्ट्रीय नेटवर्क, नेतृत्व आणि योग्यता अशा मानकांचा समावेश होता. गुजराथमध्ये २००२ साली झालेल्या दंगलींचा प्रभाव मोदींच्या मतांवर पडलेला दिसल्याचेही पिचाई यांनी सांगितले.