अजगराने घेतला दोन चिमुकल्यांचा बळी

कॅनडा – परदेशामध्ये प्राणी पाळण्याचे आणि त्यांच्या विक्रीचे प्रमाण खूपच जास्त आहे. मात्र त्यातही विचित्र आणि धोकादायक प्राणी पाळणार्‍यांचे प्रकारही परदेशात पाहायला मिळतात आणि अशा प्रेमींची हौस भागवण्यासाठी अशा प्राण्यांची विक्री करणारी दुकानेही सर्रास थाटलेली पाहायला मिळतात. पण अशा विचित्र छंदामुळे अलीकडेच कॅनडामधील दोन चिमुकल्यांना त्यांचा जीव गमवावा लागला.

नोआ आणि कॉनर अशी या दोन भावांची नावे असून ते अनुक्रमे सात व पाच वर्षाचे होते. कॅनडामधील न्यू ब्रुन्सविक सिटी ऑफ कॅम्पबेल्टन या लहानशा शहरात, ज्यांना सर्वसामान्य लोक पाळणार नाहीत, अशा प्राण्यांची विक्री करणा-या एका दुकानाच्या खाली असलेल्या घरात ते राहत होते. या दुकानात मगरी, कासवे आणि इतर अनेक प्रकारचे साप व अजगर विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. याच प्राण्यांमधील एक अजगर रात्रीच्या वेळी त्याच्या पिंज-यांतून रहस्यमयरीत्या निसटला आणि खाली राहणा-या दोन भावडांच्या घराच्या छतामधून त्यांच्या अंगावर पडला. ही भावंडे गाढ झोपेत असल्याने त्यांना अजगराची चाहूल लागली नाही आणि या दोन्ही भावंडांना त्या अजगराने विळखा घालून ठार मारले.

14 ते 16 फूट लांबीचा रॉक पायथॉनफ प्रकारचा हा अजगर होता. हवा खेळती राहण्यासाठी घराला असलेल्या झडपांमधून हा अजगर आत शिरला आणि छतापर्यंत
पोहोचला. या दुकानाचे मालक जाँ क्ला सेव्हो यांचे या मुलांच्या कुटुंबीयांशी चांगले संबंध होते. ही मुले त्यांच्या दुकानात येऊन खेळत असत व त्या दुकानातील प्राण्यांशी खेळण्यास त्यांना विशेष आवडत होते. त्यामुळेच दुस-या दिवशी सकाळी जेव्हा सेव्हो या मुलांच्या खोलीत गेले तेव्हा बिछान्यावर असलेले ते दोघे भाऊ गाढ झोपेत असल्याचा त्यांचा समज झाला. मात्र, छताला पडलेल्या भोकाकडे त्यांचे लक्ष गेले आणि तो अजगर एका कोपर्‍यात वेटोळे घालून बसलेला दिसल्यावर खरा प्रकार त्यांच्या लक्षात आला.