नवी दिल्ली – महाराष्ट्राचे विभाजन करून स्वतंत्र विदर्भ राज्याची स्थापना करण्याची जोरदार मागणी आज लोकसभेत करण्यात आली. काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. आंध्रप्रदेशचे विभाजन करून स्वतंत्र तेलंगण राज्याची निर्मिती करण्याला अलीकडेच हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. त्यापाठोपाठ देशाच्या विविध भागांतून पुन्हा स्वतंत्र राज्यनिर्मितीच्या मागण्या केल्या जात आहेत.
त्यात विदर्भाच्या मागणीचाही समावेश आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्य स्थापण्याची लोकसभेत जोरदार मागणी
मात्र, तेलंगणबाबतच्या निर्णयानंतर ही मागणी पुन्हा पुढे करण्यात येत असल्याचे आक्षेप मुत्तेमवार यांनी फेटाळले. विदर्भाची मागणी हा काही तेलंगणच्या घोषणेचा परिणाम नाही. ही मागणी जुनीच असल्याची भूमिका त्यांनी मांडली. ब्रिटीश प्रशासनाने 125 वर्षांपूर्वी म्हणजे 1888 मध्ये स्वतंत्र विदर्भ राज्याची स्थापना करण्याची शिफारस ब्रिटीश कमिशन रेटला केली होती, याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले.
विदर्भ विभाग आर्थिकदृष्ट्या सर्वांत मागास राहिला आहे. चांगल्या प्रशासनाचा अभाव, स्थानिक समस्यांचा विचार करता स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी अनिवार्यच बनली आहे, असेही मुत्तेमवार म्हणाले.
