भारत -पाक सीमेवर पुन्हा गोळीबार

पुंछ – पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय सीमेवर गोळीबार केला. ही घटना ताजी असतानाच बुधवारीसुद्धा भारत-पाक नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या ना’पाक’कृती सुरुच आहेत. पाकिस्तानी सैन्याने बुधवारी सकाळी उरी येथील भारतीय चौकीवर गोळीबार केला. त्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्यूत्तर दिले. अंदाजे तीन तास चाललेल्या गोळीबारात पाकिस्तानचे पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, पाकिस्तानी सैनिकांच्या हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झाले आहेत. संपूर्ण देशातून पाकिस्तानचा निषेध होत असून त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी केली जात आहे. मात्र, भारताकडून चोख प्रत्युत्तर मिळत नसल्यामुळे पाकिस्तानची हिम्मत आणखी वाढली असल्याचे दिसत आहे. आज (बुधवार) एलओसीवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला आहे. उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला आहे.

अधिकृत सुत्रांच्या माहितीनुसार भारतीय सैनिकांनीही पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. हल्लेखोरांना पाकिस्तानी लष्कराच्या वेषातील दहशतवादी म्हटल्यामुळे संरक्षण मंत्री ए. के. अ‍ॅन्टनींवर प्रमुख विरोधीपक्ष भारतीय जनता पक्षाने जोरदार हल्ला केला आहे. अ‍ॅन्टनी भारताचे संरक्षण मंत्री आहेत, की पाकिस्तानचे असा सवाल यशवंत सिन्हा यांनी उपस्थित केला.

लोकसभेतील विरोधीपक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी आरोप केला, की संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर भारतीय लष्कराने त्यांच्या वक्तव्यात बदल केला आहे. स्वराज यांनी सभागृहात दोन्ही वक्तव्य वाचून दाखविले. त्यांनी आरोप केला, की संरक्षण मंत्र्यांनी पाकिस्तानला बचावाची संधी निर्माण करून दिली आहे. अ‍ॅन्टनी भागृहात नसल्यामुळे स्वराज यांनी पंतप्रधानांनी याबाबत उत्तर देण्याची आणि हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरण्याची मागणी केली. मात्र, पंतप्रधान डॉ. नमोहनसिंग यांनी प्रतिक्रीया दिली नाही.

विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्याची घोषणा केली. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर तेलंगणा आणि पश्चिम बंगाल मधील कायदा आणि सुव्यवस्था यावरून गदारोळ सुरु झाला. त्यामुळे दुपारी 2 वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे.

Leave a Comment