पोलिसांची घरे खाली करण्याची कारवाई थांबवावी

मुंबई – वरळी पोलीस वसाहतीत राहत असलेल्या 180 पोलिसांची घरे खाली करण्याची कारवाई थांबवावी, असे आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज दिले. यामुळे या पोलिसांना दिलासा मिळाला आहे. इमारती धोकादायक आहेत या कारणावरून 1 ऑगस्ट रोजी या वसाहतीतील पोलिसांना नोटीस बजावण्यात आली होती. यामुळे या पोलिसांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते.

ही नोटीस मागे घेऊन तात्काळ कारवाई थांबवावी. या मागणीसाठी शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने आज गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी गृहमंत्र्यांनी हे आदेश दिले. या इमारती अत्यंत धोकादायक आहेत म्हणून तातडीने घरे खाली करावी लागतील, अशी परिस्थिती नसल्याचा अभिप्राय सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे.

शाळेचे शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरु झाले आहे. त्यामुळे आता घरातून पोलिसांना निष्कासित केल्यास मुलांच्या शाळा, अभ्यास आणि एकूणच सर्व कुटुंबांचे जीवन विस्कळीत होणार आहे. त्यामुळे या पोलिसांना निष्कासित करण्याची सुरु केलेली कारवाई तात्काळ स्थगीत करावी. अशी मागणी या शिष्टमंडळाने गृहमंत्र्यांकडे एका निवेदनाव्दारे केली.

Leave a Comment