ध्यानधारणेमुळे धूम्रपानात घट

yoga
वॉशिंग्टन – अमेरिकेतल्या काही मानस शास्त्रज्ञांनी ध्यानाची नवीन पद्धती विकसित केली असून तिच्या माध्यमातून धूम्रपानाचे प्रमाण कमी होऊ शकते, असा दावा केला आहे. इंटिग्रेटिव्ह बॉडी माईंड ट्रेनिंग (आयबीएमटी) असे या नव्या पद्धतीचे नामकरण करण्यात आले असून ध्यानाचे हे प्रशिक्षण दिलेल्या व्यसनी लोकांचे काही दिवसांच्या साधनेनंतर ६० टक्के धूम्रपान कमी झाले असल्याचे त्यांना आढळले आहे.

मनाच्या शक्तीचा योग्य उपयोग करण्याच्या ध्यानाच्या या नव्या तंत्राचे प्रशिक्षण देण्यासाठी काही विशिष्ट धूम्रपींची निवड करण्यात आली. ज्यांना सिगारेट सोडण्याची तीव्र इच्छा आहे अशाच लोकांना हे प्रशिक्षण देण्यात आले. म्हणजे धूम्रपान सोडण्याची तीव्र इच्छा आणि आपण ते सोडू शकतो अशी सकारात्मक विचारसरणी ही या प्रशिक्षणाची पूर्व अट आहे. म्हणजे या प्रयोगामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंगचा वापर करण्यात आलेला आहे.

अमेरिकेतल्या संशोधकांनी २७ धूम्रपींवर हा प्रयोग केला. या लोकांचे सरासरी वय २१ वर्षे होते आणि ते दररोज सरासरी १० सिगारेट ओढत होते. त्यातल्या १५ लोकांना आयबीएमटी चे प्रशिक्षण देण्यात आले आणि बाकीच्या १२ लोकांवर धूम्रपान मुक्तीच्या अन्य उपायांचा प्रयोग करण्यात आला. तेव्हा आयबीएमटीचे प्रशिक्षण घेणार्‍यांचे सिगारेट ओढणे मोठ्या प्रमाणावर कमी झाले असे दिसून आले. या ध्यानाच्या प्रकारात धूम्रपीचे आपल्या मनावरचे नियंत्रण वाढते असे आढळून आले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment