रामपूर – उत्तर प्रदेशातील रामपूरचे दलित लेखक कमल भारती यांना राज्यातील बहुचर्चित सनदी अधिकारी दुर्गा नागपाल यांच्या समर्थनार्थ लिहिलेल्या ब्लॉगबद्दल अटक करण्यात आली आहे. या ब्लॉगमध्ये कमल भारती यांनी उत्तर प्रदेशाचे ज्येष्ठ मंत्री आझम खान यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले असल्याची तक्रार आझम खान यांच्या समर्थकांनी केल्यावरून रामपूरच्या पोलिसांनी कमल भारती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
दुर्गा नागपाल समर्थक लेखकास अटक
उत्तर प्रदेश सरकारने दुर्गा नागपाल यांना निलंबित करताना त्यांच्यावर एका मशिदीची भिंत पाडल्याचा आरोप लावला आहे. या प्रकरणात दुर्गा नागपाल यांच्यावर अन्याय झाला आहे आणि अशा प्रकरणांमध्ये उत्तर प्रदेश सरकार पक्षपाताची वागणूक देत असल्याचा आरोप कमल भारती यांनी केला आहे. याच रामपूरमध्ये एका बेकायदा मदरशाची इमारत पाडण्यात आली. परंतु त्या प्रकरणात तो आदेश देणार्या सरकारी अधिकार्यावर कारवाई झाली नाही, उलट त्या मदरशाच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली. मशिदीच्या प्रकरणात मात्र दुर्गा नागपाल या अधिकार्यावर कारवाई झाली.
अशा कारवाया नगरविकास मंत्री आझम खान यांच्या लहरीनुसार केल्या जातात. उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य चालत नसून आझम खान यांची मनमानी चालत असते, असे कमल भारती यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. परंतु हा ब्लॉग लिहिताना कमल भारती यांनी आझम खान यांच्या विरोधात काही आक्षेपार्ह विधाने केली आहेत अशी तक्रार आझम खान यांचे जनसंपर्क अधिकारी ङ्गसहत अली खान यांनी केली आहे. त्यावरून रामपूरच्या सिव्हिल लाईन्स् पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून भारती यांना अटक करण्यात आली आणि न्यायालयासमोर उभे करून त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आले.
