चिन्यांनी उभारले डुप्लिकेट पॅरिस

शांघाय – फ्रान्सची राजधानी पॅरिस शहराची भुरळ अनेकांना पडते हे सत्य आहे. मात्र चिन्यांनी हुबेहुब पॅरिस वाटावे असे शहर झेजियांग प्रांतात उभारले असून तियांडचेंग असे या शहराचे नामकरण केले आहे. केवळ पॅरिससारख्या इमारतीच नाही तर जगप्रसिद्ध आयफेल टॉवरची डुप्लिकेटही या शहरात उभारली गेली आहे. २००७ मध्ये या शहराची निर्मिती सुरू करण्यात आली होती व आज ते चीनमधील हॉट प्रॉपर्टी मार्केट बनले आहे. मात्र असे असले तरी अन्य आशियाई लोकांप्रमाणेच चीनीही अंधश्रद्धाळू असल्याने स्थानिक प्रसारमाध्यमांनी या शहराला घोस्ट टांऊन असे संबोधणेच पसंत केले आहे.

झेजियांग गुआंग्शा लिमिटेड या बांधकाम कंपनीकडे या शहराच्या उभारणीचे काम सोपविले गेले होते. त्यानी ते अतिशय उत्तमरितीने पार पाडले आहे. या शहरातील गल्ल्या इंग्लंड, पॅरिस, जर्मनी व फ्रान्समधील अन्य शहराच्या गल्यांशी साधर्म्य असलेल्या आहेत. शहरात उभारण्यात आलेला टॉवर हुबेहुब आयफेल टॉवरसारखाच आहे मात्र खरा आयफेल याच्या तिप्पट उंचीचा आहे. टॉवरजवळ रहिवासी इमारती आणि मार्केट आहेच पण टॉवरजवळ असलेल्या इमारतीत १० हजार लोक राहू शकतात. अर्थात चीनमधील खूपच कमी नागरिकांना या शहराची माहिती आहे असेही दिसून आले आहे.

या शहराचे फोटो काढण्यास फोटोग्राफरना सहज परवानगी दिली जात नाही असेही समजते. या शहरात एका रात्रीच्या मुक्कामासाठी किमान ८२ डॉलर्स खर्च करावे लागतात असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment