मुंबई – दिल्लीतील संसदेच्या दोन्ही सभागृहातील कामकाजांचे प्रक्षेपण ज्याप्रमाणे होते तसेच आता महाराष्ट्राच्या विधानसभा व परिषदेचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी स्वतंत्र दूरदर्शन चॅनलची सुरवात होत असून त्यासाठी ५० कोटी रूपये खर्च केले जाणार आहे. पुढील पावसाळी अधिवेशनापासून हे चॅनल सुरू होईल असे समजते. हे प्रक्षेपण सुरू झाल्यानंतर अशा प्रकारचे थेट प्रक्षेपण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य बनणार आहे.
गेल्या दोन जुलैला या संदर्भात विधानभवनात एक बैठक झाली होती. त्याला मुख्यमंत्री चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख व विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटील तसेच विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे उपस्थित होते. याच बैठकीत असे चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी अधिकार्यांचे एक पथक दिल्लीला लोकसभा व राज्यसभेचे टिव्ही प्रक्षेपण कसे केले जाते याच्या अभ्यासासाठी रवाना करण्यात आले आहे असेही समजते.
या प्रकल्पातील अधिकारयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या विधानपरिषद व विधानसभेसाठी एकच चॅनल सुरू करण्यात येणार असून आळीपाळीने दोन्ही सभागृहतील कामकाज दाखविले जाणार आहे. अधिवेशन नसेल तेव्हा विविध विषयांवरील चर्चा, परिसंवादांचे प्रक्षेपण केले जाणार आहे माध्यमे या सभागृहांचे कामकाज योग्य रितीने जनतेपर्यंत पोहोचवित नाहीत. अनेकवेळा येथे गंभीर विषयांवर उत्तम भाषषे होतात मात्र प्रसारमाध्यमांनाही मर्यादा असल्याने प्रक्षेपणांत त्यांच्यावरही बंधने येतात हे लक्षात घेऊन स्वतंत्र चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई शिवाय नागपूर विधानभवनातही स्टुडिओ उभारला जात असल्याचेही सांगितले जात आहे.