भारत – पाकिस्तानच्या लष्कर महासंचालकांची हॉटलाईनवर चर्चा

इस्लामाबाद – नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी आज (बुधवार) भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या लष्कराच्या महासंचालकांदरम्यान हॉटलाईनवर चर्चा करण्यात आली. यामध्ये पाकिस्तानने युध्द विरामच्या प्रस्तावाचे पालन करण्याचे आज पुन्हा सांगितले आहे. एक दिवसापूर्वी दोन्ही देशांतील सैन्याने एकमेकांवर युध्द विरामाच्या ठरावाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

भारतीय संरक्षण अधिकार्‍यांनी पाकिस्तानी सैनिकांनी सोमवारी रात्री जम्मू काश्मिर जवळील पुँछ सेक्टरमधील चार चौक्यांवर हल्ला करुन पाच सैनिकांची हत्या केल्याचे सांगितले होते. तर पाकिस्तानी सेनेकडून भारतीय सैनिकांद्वारे बुधवारी पाकिस्तानच्या एका चौकीवर गोळीबारी करुन त्यांच्या दोन सैनिकांना गंभीर जखमी केल्याचे सांगण्यात आले आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पूँछ विभागात पाकिस्तानी सैन्याने सोमवारी मध्यरात्रीनंतर भारतीय हद्दीत घुसखोरी करून भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर हल्ला चढविला होता. यात एका सुभेदारासह पाच जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्यात हुतात्मा झालेले सर्व जवान 21 बिहार युनिट’चे होते. प्रेमनाथ सिंह, शंबू सरन राय, व्ही. कुमार राय, रघुनंदन प्रसाद आणि कुंडलिक केरबा माने अशी त्यांची नावे आहेत.

संरक्षण दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा-एकच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराच्या वेशातील वीस सशस्त्र सैनिक भारतीय हद्दीत दाखल झाले. एलओसी’वर असलेल्या सरला पोस्टजवळ गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांवर त्यांनी बेछूट गोळीबार केला. भारतीय जवानांनीही त्यास प्रत्युत्तर दिले. भारतीय हद्दीत सुमारे पाचशे मीटर अंतरावर तास-दीड तास ही चकमक सुरू होती.