नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीने येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदारांमध्ये पक्षाविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी ‘नयी सोच, नयी उम्मीद’ अशी घोषणा निश्चित केली आहे. पक्षाच्या विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली. लवकरच या निवडणुकीतले पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली जाणार असून पक्षाचे घोषवाक्य छापलेली नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रासहितची भित्तीपत्रके छापली जाणार आहेत.
भाजपाची घोषणा ‘नयी सोच, नयी उम्मीद’
भारतीय जनता पार्टीने देशातल्या तरुण मतदारांना आकृष्ट करण्याची रणनीती आखली आहे. कारण भारतात तरुण मतदारांची संख्या मोठी आहे. २०२० साली भारत हा जगातला सर्वात तरुण देश ठरणार आहे. त्यावर्षी देशातल्या तरुणांचे लोकसंख्येतले प्रमाण ६४ टक्के एवढे असणार आहे. या गोष्टीचा विचार करून पक्षाच्या भित्तीपत्रकांवर नरेंद्र मोदी यांच्या छबीखाली युथ आयकॉन हे अभिधान प्रसिद्ध केले जाणार आहे.
कमळ हे भाजपाचे निवडणूक चिन्ह आहे. त्या कमळाचा विविध प्रकारे वापर करून नरेंद्र मोदी आणि नवी घोषणा यांच्यासह आकर्षक भित्तीपत्रके आणि जाहिराती तयार करण्याचे काम भाजपाच्या प्रचार समितीतर्ङ्गे मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. त्या व्यतिरिक्त इंटरनेटचा वापर करून तरुण मतदारांपर्यंत पोचण्याचा मोठा प्रयत्न सुरू आहे. याच हेतूने भारतीय जनता युवा मोर्चा या भाजपाच्या युवा आघाडीला हिरीरीने प्रचाराच्या मैदानात उतरवले जात आहे. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तरुणांमध्ये टी शर्टस्, स्टिकर्स अशा माध्यमांतून प्रचार करण्याचे ठरवले आहे. त्या व्यतिरिक्त भिंती रंगवणे आणि हस्तपत्रके यांच्याही माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचाराचा प्रयत्न होणार आहे.