क्युरिऑसिटी रोव्हरचा पहिला वाढदिवस साजरा

कॅलिफोर्निया – ६ ऑगस्ट २०१२ रोजी नासाने मंगळावर सोडलेल्या क्युरिऑसिटी रोव्हर यानाचा पहिला वाढदिवस आज अमेरिकेत साजरा केला जात आहे. कारच्या आकाराचे हे यान यशस्वीपणे मंगळावर उतरलेच पण त्याच्यावर सोपविण्यात आलेले कामही ते चोख पार पाडते आहे. या यानाकडून मिळालेली माहिती, मातीचे नमुने, प्रतिमा अतिशय महत्त्वाच्या आहेत. यामुळे भविष्यात मंगळावर मानव पाठविण्याच्या कार्यक्रमात मोठीच मदत मिळणार आहे असे नासाचे प्रशासक चार्लस बोल्डेन यांनी सांगितले. ते म्हणाले सध्या मंगळाच्या भूमीवर चाकांच्या खुणा उमटत आहेत पण लवकरच तेथे मानवी पाऊलेही आपला ठसा उमटवतील.

क्युरिऑसिटीने आत्तापर्यंत १९० गेगाबाईट डेटा पृथ्वीवर पाठविला आहे. ३६७०० पूर्ण फोटो तर ३५ हजार अंगठ्याच्या नखाइतके फोटोही पाठविले असून मंगळावर जमिनीचे नमुने घेताना ७५ हजार लेझर शॉर्टस वापरले आहेत. जमिनीत ड्रिलिंग करून तेथील मातीचे नमुने गोळा करणे, त्यांचे विश्लेषण करण्याचे कामही त्याने पार पाडले आहे आणि आत्तापर्यंत दीड किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासही मंगळाच्या भूमीवर केला आहे.

या अभियानाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वॉशिग्टन डीसीमध्ये अध्यक्षांच्या घरासमोरून या यानाच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढली गेली असल्याचेही समजते.