उत्तराखंडमधील जलप्रलयात 6 हजारहून अधिक मृत्युमुखी पडल्याची भीती

नवी दिल्ली – उत्तराखंडला जूनमध्ये महापुराने आणि ढगफुटीने जोरदार तडाखा दिला. त्या जलप्रलयात 6 हजारहून अधिक लोक मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, असे निवेदन आज संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी लोकसभेत केले.

उत्तरांखडमधील आपत्तीत 580 हून अधिक लोक मृत्युमुखी पडल्याची पुष्टी करण्यात आली आहे. त्याशिवाय, 5 हजार 474 लोक अजूनही बेपत्ता आहेत. ते जिवंत असण्याची शक्यता नसल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, असे अँटनी यांनी सांगितले. उद्ध्वस्त झालेले रस्ते, प्रतिकूल हवामान, दुर्गम भाग असूनही शक्य तितक्या कमी कालावधीत सुमारे 1.1 लाख लोकांची सुटका करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

भारतीय हवाई दलाने 23 हजार 775, लष्कराने 38 हजार 750 तर भारत-तिबेट सीमा पोलिसांनी 33 हजार लोकांची सुटका केली. उत्तराखंडसाठी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी 1 हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. त्या राज्यातील फेरउभारणी आणि पुनर्वसनाच्या प्रक्रियेला गती देण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची समिती स्थापन करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

अँटनी यांच्या निवेदनावेळी भाजप सदस्य सभागृहात उभे राहिले. अजूनपर्यंत कुठलाही निधी उत्तराखंडपर्यंत पोहचला नसल्याचा मुद्दा त्यांनी लावून धरला. तर, समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी या मुद्द्यावर चर्चेचा आग्रह धरला.