पुणे – उच्च शिक्षण सुधारणांबाबत महाराष्ट्र शासन दाखवित असलेली उदासीनता आणि खासगी विद्यापीठांच्या स्थापनेबाबत सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी बिल २०११ ला मंजुरी देण्यास होत असलेली दिरंगाई यामुळे त्रस्त झालेल्या सिंबायोसिस आणि एमआयटी या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी आपला मुक्काम आता मध्यप्रदेशाकडे वळविला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
या संबंधात सिबायोसिस तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेश सरकारकडून या संदर्भात फारच चांगले सहकार्य मिळाले आहे आणि तेथील सरकारी यंत्रणाही त्वरीत निर्णय घेत आहे. महाराष्ट्र शासनाकडे खासगी विद्यापीठांबाबतचा प्रस्ताव सादर करून दोन वर्षे झाली तरी कोणताही निर्णय घेतला जात नाही. परिणामी मध्यप्रदेशात संस्था स्कील डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीची स्थापना करत आहे. तेथील सरकारने त्यासाठी इंदोरजवळ २५ एकर जागा संस्थेला उपलब्ध करून दिली असून ५० टक्के सवलतही दिली आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान आक्टोबर १२ मध्ये पुण्यात आले होते तेव्हाच त्यांनी उद्योजक व शिक्षण संस्थांना मध्यप्रदेशात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते असे सांगून एमआयटीचे कार्यकारी अधिकारी मंगेश कराड म्हणाले की त्यांची संस्थाही मध्यप्रदेशात विद्यापीठ स्थापन करणार आहे. येत्या पाच वर्षात त्यात १०० कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार असून मध्यप्रदेश सरकारने त्यांना ५० एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्रात लालफितीच्या कारभारामुळे प्रस्ताव मंजुरीस वेळ लागतो आहे. त्यामानाने मध्यप्रदेशात हे प्रस्ताव झटपट मंजूर होत आहेत. या निमित्ताने प्रथमच एमआयटी महाराष्ट्राबाहेर जात असल्याचेही त्यांनी सांगितले.