भारतरत्न दोघांनाही द्या

मुळात भारतात भारत रत्न हा किताब सामाजिक आणि शास्त्रीय कार्यासाठी दिला जातो. आजवर तो एखाद्या खेळाडूला देण्याचा विचारच झाला नव्हता. कारण आपल्या देशात खेळाडूचे कौतुक केले जात असते पण त्याला भारत रत्न किताब देण्याइतकी प्रतिष्ठा नाही. पण सचिनच्या चाहत्यांनी त्याला हा सर्वोच्च किताब देण्याची मागणी लावून धरली, तिला अनेक मान्यवरांनी दुजोरा दिला. डॉ, कलाम यांचे क्षेपणास्त्र विकसित करण्याचे काम जितके महत्त्वाचे आहे तितकेच सचिन तेंडूलकरचेही काम महत्त्वाचे आहे हे मानायला काही हरकत नाही असे सरकारलाही वाटायला लागले. पण खेळाडूला हा सन्मान द्यायचा म्हटले की, त्यासाठी ठरवण्यात आलेल्या निकषात बदल करणे गरजेचे आहे हे ध्यानात आले. बहुतेक तसे बदल करण्यात आले असावेत म्हणूनच सरकार खेळाडूला भारत रत्न करायला तयार झाले आहे. मात्र गंमत अशी झाली की, हा बदल करतानाच सचिन तेंडुलकर इतकेच मेजर ध्यानचंद हेही या किताबाला पात्र आहेत असे लक्षात यायला लागले. म्हणून सरकारने निकषात बदल करून सचिनच्या ऐवजी ध्यानचंद यांचीच शिङ्गारस केली आहे.

असे असले तरीही सचिनची योेग्यता कमी नसल्याचे सरकारने मान्य केले आहे. मात्र या प्रसंगी आपणही मेजर ध्यानचंद हे नेमके कोण होते हेही नव्या पिढीला समजले पाहिजे. ध्यानचंद यांनी हॉकीत केलेली कामगिरी सचिन एवढी किंबहुना त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. एक काळ त्यांनीही हे क्षेत्र ङ्गार गाजवले आहे. त्यांचा जन्म १९०५ सालचा आणि त्यांनी १९२८ ते १९४८ हा काळ गाजवला आहे. १९७९ साली त्यांचे निधन झाले त्यामुळे आज त्यांचे विस्मरण होणे साहजिक आहे. म्हणून ध्यानचंद यांना सचिनच्या आधी हा किताब ने देणे हा ध्यानचंद यांच्यावर अन्याय होईल असे सरकारला वाटले. ध्यानचंद यांच्या कारकीर्दीवर नजर टाकली असता असे लक्षात येेते की, त्यांनी भारताला हॉकीत ङ्गार मोठा सन्मान मिळवून दिलेला आहे. हा १०० कोटीचा देश अलीकडे अलीकडे पर्यंत ऑलिंपिक मधून वैयक्तिक सुवर्णपदक आणू शकला नव्हता. पण ध्यानचंद यांच्या जादुई शैलीमुळे १९२८ (ऍमस्टरडॅम), १९३२ (लॉस एंजल्स) आणि १९३६ (बर्लिन) या तीन ऑलिंपिक स्पर्धात भारताला हॉकींतले सुवर्णपदक मिळाले होते. त्यानंतर १२ वर्षांनी झालेल्या म्हणजे १९४८च्या ऑलिंपिकमध्ये ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा हे पदक मिळाले.

भारतासाठी तो सुवर्ण काळ होता. पहिल्या ऍमस्टरडॅमच्या ऑलिंपिक मध्ये झालेल्या सहा सामन्यांत भारताने २९ गोल केले होते त्यातले १४ गोल ध्यानचंद यांचे होते. यातल्या बहुतेक सामन्यात भारताच्या प्रतिस्पर्ध्यांना एकही गोल करता आला नव्हता. अमेरिकेत लॉस एंजल्स येथे झालेल्या १९३२ च्या ऑलिंपिक स्पर्धेत तर अंतिम सामन्यात भारताची गाठ साक्षात अमेरिकेशी पडली होती पण हा सामना भारताने २४ वि. ० गोलने जिंकला. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा तो एक अविस्मरणीय सामना मानला जातो आणि आजवर या स्तरावरच्या सामन्यात अन्य कोणत्याच संघाला अशा गोल ङ्गरकाने जिंकता आलेले नाही. १९३६ साली जर्मनीत झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत तर जर्मनीतल्या वृत्तपत्रांनी ध्यानचंद यांची तोंड भरून प्रशंसा केली. हॉकीचे जादुगर ही पदवी त्यांना आधी जर्मन लोकांनी दिली आहे. आज ब्रिटनमध्ये त्यांचा पुतळा तर आहेच पण भुयारी रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव दिलेले आहे. क्रिकेटच्या जगाचा बादशहा म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या डॉन ब्रॅडमनशी ध्यानचंद यांची ऑस्ट्रेलियातच भेट झाली होती. ध्यानचंद यांची चेंडूवरची पकड बघून ब्रॅडमनही वेडा झाला होता. तो म्हणाला, हा तर ङ्गलंदाजाने धावा काढाव्यात तसे हॉकीत गोल करीत आहे.

ध्यानचंद यांनी अनेक विक्रमांसह आंतरराष्ट्रीय सामन्यात ४०० गोल केलेले असून अन्य प्रथम श्रेणी सामन्यांत एक हजारावर गोल नांेंदले आहेत. जगभरातले क्रीड तज्ञ अजूनही ग्वाही देतात की ध्यानचंद यांच्यासारखा हॉकीपटू अजून तरी या पृथ्वीतलावर जन्मलेला नाही. भारत सरकारने त्यांना १९५६ साली पद्मभूषण किताब दिला होता. हे सारे कळल्याने ध्यानचंद यांना भारत रत्न किताब देणे हा त्यांचा उचित सन्मान आहे हे कोणालाही पटेल पण आता सरकारने ध्यानचंद की सचिन असा प्रश्‍न निर्माण करून ठेवला आहे. तो अनावश्यक वाटतो. हा किताब एका वेळी एकालाच द्यावा असा काही दंडक नाही. तो या दोघांनाही देता येतो. सरकारने तसा निर्णय घ्यावा. ध्यानचंद हे तर श्रेष्ठच आहेत पण हा किताब सचिनला नाकारावा असे त्याच्यातही काही कमी नाही. त्याला ऑस्ट्रेलियाने त्या देशातला मोठा नागरी सन्मान दिला आहे. मग आपल्याच सरकारने या बाबत काही कंजुषी करण्याची काही गरज नाही. येत्या प्रजासत्ताक दिनाला हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद आणि क्रिकेट मधले उत्तुंग शिखर ठरलेला विक्रमादित्य लिटल मास्टर सचिन हे दोघेही एकदमच भारत रत्न होतील अशी आशा करू या.

Leave a Comment