जम्मू: पाक सैन्याचा हल्ला, 5 जवान शहीद

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागातील सीमारेषेजवळील परिसरात पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केलाय. सीमारेषेजवळ असलेल्या भारतीय
सैन्याच्या चौकीवर हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात पाच जवान शहीद झाल्याची माहिती मिळतेय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी सैन्यानं भारताच्या हद्दीत घुसून हा गोळीबार केलाय. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट’द्वारे हल्ल्याच्या बातमीची पुष्टी केलीय. याआधीही पाकिस्तानी सैन्यानं युद्धविरामाचं उल्लंघन केलंय. मागील सहा महिन्यांत 33 वेळा पाकिस्तानी सैन्यानं नियमांचं उल्लघंन केलंय.

संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी हे या हल्ल्याबाबत आज संसदेत निवेदन सादर करणार आहेत. युद्धनियमांचं सर्वाधिक वेळा उल्लंघन जुलै महिन्यात झालं असल्याची माहिती कालच संरक्षणमंत्र्यांनी लोकसभेत दिली होती. जुलैमध्ये तब्बल 11 वेळा पाकिस्ताननं युद्ध नियमांचं उल्लंघन केलंय.

या हल्ल्यात मराठा रेजिमेंटचे नाईक पुंडलिक माने शहीद झाले आहेत. तर संभाजी कुटे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुंछच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बिहारच्या चौघांना वीरमरण आलं आहे. शहीदांमध्ये बिहार रेजिमेंटच्या नाईक प्रेम नाथ सिंग, लान्स नाईक शंभू सरन रे, शिपाई व्यय कुमार रे, शिपाई रघुनंदन प्रसाद यांचा समावेश आहे.

पुँछ जिल्ह्यातील चक्कां दा बाग’ या लष्काराच्या चौकीवर पाकिस्तानने काल रात्री हल्ला केला. हल्ल्यावेळी 21 बिहार रिजिमेंटचे जवान चौकीत तैनात होते. जम्मूपासून पावणे तीनशे किलोमीटरवर असणार्‍या सरवा पोस्टजवळ पाकिस्तानी सैनिकांनी हा हल्ला केला. भारतीय जवान सकाळी तीन ते चार च्यादरम्यान गस्त घालत असताना हा हल्ला झाला.

हा हल्ला सापळा रचून करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. लष्कर ए तोएबा’चा प्रमुख हाफिस सईद याच्या इशार्‍यावरून हा हल्ला झाल्याची माहिती आता समोर येत आहे. दरम्यान, पाकिस्तानने मात्र असा कुठलाही हल्ला केला नसल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तान सरकारच्या प्रवक्त्यांनी असा कुठलाही प्रकार पुंछ सेक्टरमध्ये काल रात्री घडलेलाच नसल्याचं म्हटलं आहे.

पुंछच्या हल्ल्यानंतर आज भारत सरकारनंपाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना खडे बोल सुनावले आहेत. असे प्रकार वारंवार का घडतात असा प्रश्न पराराष्ट्रा खात्यानं पाकच्या उपउच्चायुक्तांना मंत्रालयात बोलावून फाटकारले.