रक्तदाब नियंत्रित ठेवणारा स्पेशल स्कीन पॅच

टोकियो -उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवणारा तसेच हार्ट अॅटॅक अथवा स्ट्रोक येण्यापासून बचाव करणारा विशेष स्कीन पॅच जपानमध्ये तयार करण्यात आला असून त्याच्या वापरास सरकारने परवानगी दिली आहे. जपानी फर्म निट्टो डेंको या कंपनीने हा पॅच तयार केला असून येत्या दोन वर्षात तो युकेमध्येही वापरात आणला जाणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा पॅच दररोज बदलावा लागतो. मात्र तो हातावर दंडावर अथवा पाठीवर सहज लावता येतो. त्यातून दिवसभर अतिशय संथ गतीने रकतदाबावरचे औषध त्वचेद्वारे रक्तात सोडले जाते. रक्तदाब नियंत्रणाची गोळी घेण्याने रक्तदाब एकदम कमी होण्याचा अथवा वाढण्याचा असलेला धोका या पॅचमध्ये नाही. संथ गतीने औषध सोडले जात असल्याने हार्ट अॅटॅक अथवा स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. एका पॅचमध्ये ४ ते ८ मिलिग्रॅम बेटाब्लॉकर औषधांचा डोस असतो.

बेटा ब्लॉकर हे औषध गेली पन्नास वर्षे उच्च रक्तदाब, अंजायना, हार्ट फेल्युअर, मायग्रेनसाठी वापरात आहे. गोळ्या गिळण्यास ज्या रूग्णांना त्रास होतो त्यांनाही हा पॅच वरदान ठरणार आहे. एकदा हा पॅच लावला की तो चोवीस तास रकतदाब नियंत्रित ठेवतो आणि रक्तदाबाची गोळी घेतल्याचे जेवढे साईड इफेक्ट आहेत तितकेच या पॅचचे आहेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे.